Konkan Cashew  Pudhari
गोवा

Goa news | गोव्याचा सेंद्रिय काजू ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे काजू महोत्सवात प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोव्याचा सेंद्रिय काजू हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा वन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित चौथ्या काजू महोत्सवाचे उद्घाटन डॉ. सावंत यांनी केले. त्यानंतर ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार देविया राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार केदार नाईक, आमदार दाजी साळकर, आमदार निलेश काब्राल, आमदार उल्हास तुयेकर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष रेश्मा बांदोडकर, वन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. रमेशकुमार, मुख्य वन संरक्षक कमल दत्ता, अमर हेबळेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, मंत्री देविया राणे यांनी गोवा वन विकास महामंडळाला लोकाभिमुख करून दाखवले. वन महोत्सव आयोजन करून त्यांनी राज्यातील सात अभयारण्ये लोकांसमोर नेली. गोवा म्हणजे सन, सी अँड सॅन्ड नसून त्या पलीकडे ग्रामीण भाग, त्यांची अर्थव्यवस्था, धबधबे, जंगल हे सगळे आहे. त्यामुळेच अनेक पर्यटक आता बोंडला अभयारण्य व धबधब्याकडे वळू लागले आहेत.

स्वयंपूर्ण गोव्याचे 'हे' आहे प्रतीक

काजू बोंडू (अॅपल), काजू (बी), फेणी, हुर्राक आणि नीरा या गोष्टी याच हंगामात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. काजू बीपासून वेगवेगळी नावीन्यपूर्ण उत्पादने तयार केली जात आहेत. या सगळ्या गोष्टी स्वयंपूर्ण गोव्याचे प्रतीक आहेत, असेही डॉ. सावंत म्हणाले.

काजू मंडळ स्थापन करणार

गोवा वन विकास महामंडळ आणि कृषी खात्याच्या सहकार्याने काजू मंडळ (कॅश्यु बोर्ड) स्थापन करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. नावीन्य, तंत्रज्ञान आणि संशोधन यांच्या माध्यमातून पारंपरिक काजू बागायतदार आणि तरुण यांची सांगड घालायची आहे, त्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले.

डॉ. सावंत म्हणाले की, काजू महोत्सवाच्या निमित्ताने हुर्राक, फेणी कशी काढली जाते हे लोकांना पाहता आले. सिल्व्हन उत्पादनांनी काजूपासून कोणती उत्पादने घेता येतात आणि व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून व्यवसाय करता येतो हे दाखवून दिले. डॉ. सावंत म्हणाले. डॉ. सावंत यांनी सांगितले की, गोवन काजूच्या ब्रँड खाली व्यापारी दक्षिण आफ्रिका व इतर राज्यातील काजू विकत होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून ते प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे छापे असेच सुरू राहणार असून गोव्याचा काजू गोवन काजू याच ब्रँडने विकावा, इतर काजू त्या ब्रँडने विकावा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT