पेडणे : ‘ओंकार’ या हत्तीने तोरसे भागात शत्रुघ्न महादेव परब यांच्या बागायतीतील कवट झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या हत्तीचा वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात अपयश आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सरकार अद्याप ठोस उपाययोजना का करत नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
मागील तीन दिवसांपूर्वी कडशीमोपा परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर ‘ओंकार’ हत्ती आता तोरसे परिसरात दाखल झाला आहे. या भागात मिरची, हळद, भुईमूग, वांगी, मका, नाचणी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करण्यात आली आहे. हत्तीने या भागात प्रवेश केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या हत्तीचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व पंच दयानंद गवंडी यांनी केली आहे.
स्थानिक पंच रमेश बुटे यांनी सांगितले की, ‘ओंकार’ हत्तीमुळे मोठे नुकसान होऊ नये यासाठी वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी २४ तास पाळत ठेवून आहेत. चार दिवसांपूर्वी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या उपस्थितीत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. त्या वेळी हत्तीचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने लक्ष घालून या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी चेतन सावंत यांनी केली आहे.
मोठ्या हानी होण्याची भीती
दरम्यान, ‘ओंकार’ हत्तीने पाण्याच्या टाक्या, शेती, बागायती तसेच इतर साहित्याचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी कडशी-मोपा येथे उमेश गाड यांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले होते. आता हत्तीने तोरसे भागाकडे मोर्चा वळवला असून, पुढे तांबोसे परिसरात प्रवेश केल्यास आणखी मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे.