Vasco Gas Leakage Pudhari
गोवा

Vasco Gas Leakage | वास्को येथे गॅस गळतीमुळे मायलेक जखमी

गोमेकॉत उपचार सुरू; पहाटे घराच्या तळमजल्यावर स्फोट, दोघी ३० टक्के भाजल्या

पुढारी वृत्तसेवा

Vasco Gas Leakage

दाबोळी : नवेवाडे-वास्को येथील लास्ट बसस्टॉपजवळ एलपीजी गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात आई आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या. हेमा वीरप्पा गोडाची (वय ४५) आणि त्यांची मुलगी सुमित्रा (वय २३) अशी जखमींची नावे आहेत. दोघीही सुमारे ३० टक्के भाजल्या असून, त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

हेमा गोडाची आणि त्यांची मुलगी सुमित्रा घराच्या वाढवलेल्या भागातील तळमजल्यावर झोपल्या होत्या. या भागावर ॲस्बेस्टॉसचे पत्रे होते. याच ठिकाणी कुटुंबाचा किराणा व्यवसाय असून, बाजूलाच छोटे स्वयंपाकघरही आहे. दरम्यान, एलपीजी गॅसची गळती होऊन तो खोलीत साचला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घराजवळील प्रार्थनास्थळाशेजारी एक दिवा रात्री जळत ठेवण्यात आला होता. साचलेल्या गॅसने या दिव्यामुळे पेट घेतल्याने स्फोट झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. स्फोटाचा धक्का इतका जोरदार होता की, वाढवलेल्या भागावरील ॲस्बेस्टॉसची पत्रे उडून गेली. या वेळी हेमा आणि सुमित्रा यांच्या कपड्यांनी पेट घेतला.

दोघींनी कशीतरी घराबाहेर येत मदतीसाठी धाव घेतली. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली. जखमींना प्रथम चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले.

घटनेच्या वेळी सुमित्राचे वडील आणि तिची दोन मुले घराच्या पहिल्या मजल्यावर झोपले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मुरगाव पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी घटनेची माहिती दिली. वास्को पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पाहणी केली. स्फोटाचे नेमके कारण आणि अन्य बाबींचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT