Murder case : क्षुल्लक कारणावरून मेहुण्याकडून भावोजीचा खून Pudhari File Photo
गोवा

Murder case : क्षुल्लक कारणावरून मेहुण्याकडून भावोजीचा खून

संशयितास 10 दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : जेवणावेळी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून मेहुण्याने भावोजीचा खून करण्याची घटना सोमवारी रात्री कोडार येथील एका खासगी फार्म हाऊसवर घडली. फोंडा पोलिसांनी संशयित डेव्हिडला रात्रीच अटक केली. फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर त्याला उभे केले असता, 10 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

खुद्द मेहुण्यानेच आपल्या भावोजीचा खून करण्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. हा प्रकार कोडार-बेतोडा येथील शिरांतर या दुर्गम भागातील फार्म हाऊसवर घडला.

कोडार-बेतोडा येथील श्रीकांत उमर्ये कुटुंबीयांच्या बागायतीची देखभाल व राखणदारी करण्यासाठी मूळ झारखंड येथील मेहुणा आणि भावोजीला कामावर ठेवण्यात आले होते. झाडांना पाणी घालणे तसेच इतर कामांबरोबरच बागायतीची आणि गुरांची देखभाल करणे आदी कामांसाठी मूळ झारखंड येथील डेव्हीड शिलास टोपो (वय 40) व दीपक बोल्तास तिर्की (वय 27) या मेहुणा व भावोजीला बागायत मालकाने कामावर ठेवले होते.

सोमवारी रात्री जेवणापूर्वी दोघांनी मद्यपान केले मात्र त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची होऊन डेव्हिड टोपो याने आपला भावोजी दीपक तिर्के याच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार केला. हा वार जोरात केल्यामुळे दीपक तिर्केच्या गळ्याजवळ गंभीर स्वरुपाची जखम झाली. दीपक तिर्के जमिनीवर पडला त्यात अति रक्तस्त्रावामुळे त्याचे तेथेच निधन झाले. भांडणावेळी दोघांतही प्रचंड आरडाओरड सुरू होती. तीनच महिन्यांपूर्वी हे मेहुणा आणि भावोजी कामावर हजर झाले होते.

दरम्यान, आपल्या घरात दोघांचे जोरदार भांडण होत असल्याची माहिती बागायतीचे मालक श्रीकांत उमर्ये यांना मिळाल्यावर त्याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता दीपक तिर्के रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला तर संशयित खुनी डॅव्हिड टोपो पळण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. डेव्हिडला रितसर अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दीपक तिर्के याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी इस्पितळात पाठवण्यात आला असून फोंडा पोलिस निरीक्षक राघोबा गावडे, उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

शेवटी जेवणाची थाळी तशीच राहिली

मेहुणा आणि भावोजी तसे एकमेकांचे मित्र. काल रात्री या दोघांनी चिकन मटणाचा बेत केला होता. जेवण तयारही केले होते. त्यापूर्वी दोघांनी यथेच्छ दारू ढोसली. पण दोघांत जेवणाच्या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. त्यात डेव्हिड याने आपला भावोजी दीपकवर धारदार शस्त्राने वार केला. जेवण घेण्यासाठी वाढलेले ताट मात्र तसेच राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT