पणजी : पुढारी वृत्तसेवा
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास उत्पादनांना केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठ्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे लघु व सूक्ष्म उद्योजकांना (एमएसएमई) तंत्रज्ञानाबाबत सक्षम करणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत उद्योजक तंत्रज्ञानात पारंगत होत नाहीत, तोपर्यंत त्यांची उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचू शकणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. लघु, उद्योग भारती आणि गोवा सरकारच्या उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने दोना पावला येथील दरबार हॉलमध्ये आयोजित 'गोवा एमएसएमई अधिवेशन ३.०' च्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला कॉर्पोरेट व्यवहार, रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सहकार्यवाहक कृष्ण गोपाल, लघु उद्योग भारतीच्या अध्यक्षा पल्लवी साळगावकर, सचिव मुदित अगरवाल तसेच ओमप्रकाश गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री गुदिन्हो पुढे म्हणाले की, गोव्यासारख्या छोट्या राज्यात २३ औद्योगिक वसाहती कार्यरत असून त्यांचे क्षेत्रफळ अनेक मोठ्या राज्यांतील जिल्ह्यांच्या तुलनेत लक्षणीय आहे. गोव्यात औषधनिर्माण (फार्मा) क्षेत्र झपाट्याने वाढत असून संरक्षण व एरोस्पेस घटकांच्या निर्मितीसाठी किनेको इंडस्ट्रीज हे यशस्वी उदाहरण आहे.
उद्योगांना नव्या संधींसाठी सज्ज करणे गरजेचे...
जागतिक स्तरावर भारताकडे नावीन्यपूर्ण व किफायतशीर उत्पादनांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. मात्र बदलती भू-राजकीय परिस्थिती, ट्रम्पवादाचा प्रभाव आणि आंतरराष्ट्रीय धोरणांतील अनिश्चितता हे उद्योग व समाजासाठी मोठे आव्हान ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या लोकसंख्येला सक्षम करणे आणि उद्योगांना नव्या संधींसाठी सज्ज करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.