पणजी : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यातील सुर्ला आणि चरावणे परिसरात वाघाचा वावर आढळल्याने वाघाचे संरक्षण राजेंद्र केरकर करा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी निवेदनाद्वारे वन विभागाकडे केली आहे. वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे पुन्हा एकदा आढळून आल्याने आता तरी सरकारने म्हादई अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
केरकर यांनी सांगितले की, वाघाने एका गायीवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्या संदर्भातील ट्रॅप कॅमेऱ्यामधील फुटेजही प्राप्त झाले आहे. ते सर्व पुरावे मी मुख्य वन्यजीव अधिकारी के. रमेशकुमार आणि सहायक मुख्य वन संरक्षकांकडे दिले आहेत. आता त्या वाघाला वाचवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आहे.
२०२२ पर्यंत प्रामाणिक वन अधिकारी होते. मात्र, त्यानंतरचे वन अधिकारी सरकारने आपल्या मर्जीतील नेमले आणि वाघांचे जगणे मुश्किल झाले, असेही मत त्यांनी मांडले. केरकर म्हणाले, राज्यात यापूर्वीही वाघांचे अस्तित्व असल्याचे दावे केले होते. तसेच राज्यात पाच वाघ असल्याचे सिद्ध झाले होते.
या काळात पहिल्यांदा चार वाघांना मारण्यात आले. त्यानंतर एक वाघ मृतावस्थेत आढळला. त्याचा शवचिकित्सा अहवाल मला खूप उशिरा देण्यात आला. मृत्यूचे कारण समजण्यासाठी काही अवशेष देहराडूनला पाठवले होते. त्याचा अहवाल देण्यास वन विभाग टाळाटाळ करीत आहे. माहितीच्या अधिकाराला पण जुमानत नाही, असे केरकर म्हणाले.
वाघ वाचला, तरच म्हादई वाचेल !
पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, कर्नाटक म्हादईचे ३.९ टीएमसी पाणी वळवण्याच्या प्रयत्नात आहे; पण म्हादई परिसरात वाघ असल्याने त्यांना पाणी उचलण्यात अडथळे येत आहे. वाघ वाचला, तरच म्हादई वाचणार आहे. त्यामुळे वन खात्याने वाघांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी पावले उचलायला हवी.