पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील भाजपच्या ८५ टक्के मतदारांचा मराठी भाषेशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा सत्तेवर यायचे असेल, तर सरकारने आगामी निवडणुकीपूर्वी मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा. अन्यथा २०१७ प्रमाणेच २०२७ मध्येही भाजपचा पराभव अटळ आहे. आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे, असे प्रतिपादन गोवा मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
गोव्यात कोकणीसोबत मराठी भाषेलाही राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी राज्यभर 'माउली मराठी जागर रथयात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. या रथयात्रेचा शुभारंभ शुक्रवारी पणजीतून करण्यात आला. श्री महालक्ष्मी देवी मंदिरात देवीचे आशीर्वाद घेऊन सर्व जागृती रथ राज्यभर रवाना झाले. यावेळी गोवा मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर, मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, रथयात्रेचे संयोजक श्रीगणेश गावडे, विविध प्रखंडांचे प्रतिनिधी, निमंत्रित आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.
उपस्थितांनी मराठी भाषेचा जयघोष करीत रथांवर पुष्पवृष्टी केली. यावेळी बोलताना प्रा. वेलिंगकर म्हणाले की, मराठी राजभाषेचा लढा हा गोव्याची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आहे. गेल्या ४० वर्षांपासून मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांना अनेकदा निवेदने देण्यात आली; मात्र सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे मराठी राजभाषेसाठीचा हा शेवटचा लढा असून, त्यात जनतेचा मोठा सहभाग असेल.
राज्यातील लाखो लोकांनी कोकणीसोबत मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीला पाठिंबा देत सह्या केल्या आहेत. विविध पंचायतींनी यासंदर्भात ठराव मंजूर केले आहेत. मठांचे प्रमुख आणि धर्मगुरूंनीही मराठी राजभाषेच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. अशा परिस्थितीत १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील ठराव संमत करावा. अन्यथा आगामी निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रा. वेलिंगकर यांनी दिला.
रथयात्रेमुळे राज्यभर मराठी राजभाषेच्या मागणीविषयी व्यापक जनजागृती होईल आणि या चळवळीला अधिक बळ मिळेल, असे गो. रा. ढवळीकर यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत १४ सुशोभित रथ संपूर्ण गोव्यात फिरणार आहेत. विविध ठिकाणी या रथांचे पूजन करण्यात येणार असून, नागरिकांमध्ये मराठी राजभाषेच्या मागणीविषयी जागृती केली जाणार असल्याची माहिती रथयात्रेचे संयोजक श्रीगणेश गावडे यांनी दिली. यावेळी त्यांनी आगामी कार्यक्रमाचीही माहिती दिली. मराठी राजभाषेच्या मागणीसाठी रविवार, ६ डिसेंबर रोजी म्हापसा येथे विराट मराठी भक्त्तीसंगमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात संध्याकाळी ४ वा. हा कार्यक्रम होणार असून, त्यात हजारो मराठीप्रेमी सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
आडपईत आज मराठी राजभाषा निर्धारची रथयात्रा
गोव्यातील मराठी भाषेला कोकणीबरोबर राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर म्हापसा येथे रविवार, ६ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेली मराठी राजभाषा निर्धार समितीच्या फोंडा प्रखंडाची रथयात्रा शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी आडपई गावात दाखल होणार आहे.
ही रथयात्रा शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री दत्त मंडप, आडपई येथे पोहोचणार आहे. स्थामध्ये श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती, संत श्री ज्ञानेश्वर यांची प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत ठेवण्यात येणार आहे. या रथयात्रेचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी आडपईतील ग्रामस्थांनी सहकुटुंब व सहपरिवार वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीने केले आहे.