पणजी : दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन, मराठी चंदेरी दुनियेतील ज्येष्ठ आणि नव्या कलाकारांच्या उपस्थितीत अनेक चित्रपटांच्या प्रीमियरने गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची रविवारी सांगता झाली. याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पणजीत गोवा मनोरंजन सोसायटीच्या (ईएसजी) प्रांगणात सुरू असलेल्या विन्सन ग्राफिक्स आयोजित चौदाव्या मराठी चित्रपट महोत्सवात आज चार चित्रपटांचा प्रीमियर झाला. या दर्जेदार चित्रपटांच्या प्रदर्शनाने गोव्यातील रसिक मंत्रमुग्ध झाले. आज प्रीमियर झालेल्या चित्रपटांमध्ये गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि डॉक्टर शशी कांबळे निर्मित विद्यापीठ, तानाजी घाडगे दिग्दर्शित जित्राब, मिलिंद लेले दिग्दर्शित दृश्य अदृश्य आणि अक्षय बाळसराफ दिग्दर्शित परिणती या चित्रपटांचा समावेश होता.
विद्यापीठ हा चित्रपट गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केला असून, या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी ज्येष्ठ दिग्दर्शक राजेंद्र तालक उपस्थित होते. त्यांनी गजेंद्र अहिरे यांच्यासह निर्मात्या डॉ. शशी कांबळे, कलाकार छाया कदम, ऊर्वी पाटील यांचा सन्मान केला. एका स्त्रीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या संघर्षाची ही कथा आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अंजली पाटील प्रमुख भूमिकेत आहे. जित्राब हा चित्रपट तानाजी घाडगे यांनी दिग्दर्शित केला असून निहारिका गानबोटे आणि सुनील फडतरे यांनी निर्मित केला आहे.
सुहास पळशीकर, भरत गणेशपुरे, शिवाली परब, रोहित माने, पार्थ भालेराव यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटांची निर्मिती उत्तम प्रकारचे असून कलाकारांनी केलेला अभिनय रसिकांना मंत्रमुग्धकरतो. ग्रामीण भागांत दुष्काळात भाकड गाईंचा प्रश्न ऐरणीवर येतो. हा ज्वलंत विषय विधानसभेत गाजतो. एवढेच कशाला, हिंदू संस्कृतीत पवित्र मानल्या गेलेल्या गाईंना कत्तलखान्यात जाण्यापासून रोखणार्या तथाकथित संस्कृती रक्षकांचे बुरखेही जित्राबच्या अनुषंगाने उघडे झाले आहेत. या चित्रपटात सर्वच कलाकारांनी अतिशय संयत आणि चोख अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या कथेला प्रेमाच्या त्रिकोणाची जोड आहे, गाय हा ज्वलंत विषय आहे. गाणीही कथेला समर्पक आहेत.