दिव्यांगांसाठी लिफ्ट रॅम्प; ऑडिओ डिस्क्रिप्शन 
गोवा

IFFI 2025: दिव्यांगांसाठी लिफ्ट रॅम्प; ऑडिओ डिस्क्रिप्शन

इफ्फीतील सुविधांचे स्वागत : एनएफडीसी-राज्य सरकारतर्फे सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पणजीत सुरू असलेल्या 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सिनेरसिक आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. दरवर्षी इफ्फीच्या आयोजनामध्ये वेगवेगळे बदल करण्यात येत आहेत. मागील काही वर्षांपासून महोत्सव सर्वसमावेशक करण्याकडे एनएफडीसी आणि गोवा सरकारचा भर असल्याने यंदा त्याची प्रचिती दिव्यांग प्रेक्षकांना दिसून आली. यात मोठी बाब म्हणजे महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागातील 30 हून अधिक चित्रपट हे दृष्टिहीन व्यक्तींसाठी ऑडिओ डिस्क्रिप्शनसह उपलब्ध करण्यात आले आहेत. या सुविधांचे दिव्यांगांकडून स्वागत करण्यात येत आहे.

दिव्यांगजन आयुक्तालयाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले की, इफ्फीच्या आयोजनापूर्वी आयनॉक्स परिसरामध्ये पर्पल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इथे अनेक बदल करण्यात आले असून ईएसजी आणि पीआयबी इमारतीमध्ये दिव्यांगांसाठी लिफ्ट बसवण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी काँक्रीटचे रॅम्प बनवण्यात आले होते. इफ्फीमध्ये देखील या गोष्टींचा दिव्यांगांना चित्रपट महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मदत झाली.

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी आयोजनाचा स्तर वाढवण्यासाठी आणि सर्वांना महोत्सवाचा लाभ, आनंद घेता यावा, यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. यंदा ठिकठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्प बसवण्यासोबतच चित्रपट पाहता यावेत, यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना चित्रपट पाठवण्यापूर्वीच ऑडिओ डिस्क्रिप्शन फीचर समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे दृष्टीहीन नागरिकांना जिथे संवाद नाहीत, अशा सीनमध्ये चित्रपटात नेमके काय सुरू आहे याचा अंदाज येऊ शकतो. यासाठी एनएफडीसीने सिनेडब मोबाईल ॲप्लिकेशनसोबत भागीदारी केली आहे.

याद्वारे त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन केल्यानंतर सदर सिनेमा पाहताना आपल्याला ऑडिओ डिस्क्रिप्शन सुविधा वापरता येते. यासोबतच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनावेळी आणि समारोप सोहळ्यात देखील दुभाषींची नेमणूक करण्यात आली आहे. याद्वारे संपूर्ण समाजाला या महोत्सवाचा आनंद घेता यावा, हाच यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश असल्याचे मगदूम यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

दृष्टिहीन नागरिकही पाहताहेत सिनेमा: हाझिक

इफ्फीतील इंडियन पॅनोरमा विभागामध्ये चित्रपट ऑडिओ डिस्क्रिप्शनसह असल्याने माझ्यासारख्या दृष्टिहीन नागरिकांना देखील इतर नागरिकांसोबत बसून चित्रपटांचा आनंद घेता येत आहे. ॲपवर अजून केल्यानंतर आपल्या इयरफोनच्या माध्यमातून दिव्यांग प्रेक्षकांना ऑडिओ डिस्क्रिप्शन ऐकता येते. ही अतिशय समाधानाची बाब असून राज्य सरकार आणि एनएफडीसीच्या पुढाकारानेच हे शक्य झाले असल्याचे, आयुक्तालयाचे सचिव ताहा हाझिक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT