पणजी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवानंतर सुरू झालेल्या कौलोत्सवाचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. शनिवारी सायंकाळी देवी मुख्य मंदिरात जाणार आहे, अशी श्रद्धा असते. यंदा सरकारने देवस्थान समितीच्या सहकार्याने अनेक सुधारणा केल्या, आणि शिस्तीत देवीचे दर्शन व्हावे यासाठी कडक सुरक्षा नियम तयार केले. व ते अयशस्वी ठरले आणि जत्रोत्सव सुरळीत पार पडला.
दि. २१ रोजी जत्रोत्सव झाल्यानंतर चार दिवस कौलोत्सव सुरू आहे. जत्रेला न आलेले बहुतांश भाविक कौलोत्सवाला येतात. त्यामुळे कौलोत्सवाला मोठी गर्दी होते. गुरुवारी रात्री अशीच मोठी गर्दी झाली आणि रात्रीचे १२ वाजल्याने अनेकांना कौल न घेता घरी परतावे लागले.
आलेल्यांना कौल मिळावा
गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात भाविक कौलोत्सवासाठी आले होते, मात्र रात्रीचे १२ वा. आल्यामुळे कौल बंद करण्यात आला आणि दूर दूरवरून आलेल्या भाविकांना तसेच घरी जावे लागले. मुख्य मंदिरही बारा पूर्वीच बंद करण्यात आले. दुरून आलेल्यांचा हिरमोड झाला. आलेल्या सर्वांना कौल मिळावा यासाठी देवस्थान समितीने योग्य ते नियोजन करण्याची मागणी होत आहे.