Goa GI Tag Products
प्रभाकर धुरी
पणजी : राज्यातील कोरगुट तांदूळ, हिलारिओ व मुसारद आंबा, ताळगावची वांगी आणि काजू बोंडू या पाच वस्तूंना 'जीआय' मानांकन प्राप्त झाले आहे. ताळगावचे वांगे आपल्या विशिष्ट चवीसाठी आणि आकारासाठी प्रसिद्ध आहे. हिलारिओ हा गोव्यातील आंब्यांच्या विविध प्रकारातील एक उत्कृष्ट वाण आहे.
खाऱ्या जमिनीत येणारा कोरगुट हा पारंपरिक तांदूळ आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. गोव्याची ओळख असलेली फेणी आणि हुर्राक बनवण्यात महत्वाचा असलेला काजू बोंडू आता अधिकृत ओळख बनला आहे. तर मुसारद आंबा हा गोव्याच्या बागायती शेतीचे वैभव असून तोही जीआय टॅगने सन्मानित झाला आहे.
राज्यातील खोला मिरची, हरमल मिरची, काजू फेणी, मंडोळी केळी, खाजे, मानकुराद, गोवा काजू, आगशीचे वांगे, सातशिरा भेंडी, बेबिंका आदी वस्तूंना यापूर्वी जीआय मानांकन देऊन गौरविण्यात आले आहे.तर करवंटी कोरीव कला मानांकन प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे.
एखाद्या वस्तूचे उत्पादन एका विशिष्ट प्रदेशात घेतले जात असल्याने त्या वस्तूला भौगोलिक सूचकांक मानांकन (जीआय) देण्यात येते. कोणत्याही उत्पादन किंवा वस्तूला जीआय मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते, तसेच उत्पादनाची गुणवत्ता, नफा कायम ठेवण्यासाठी त्याचा फायदा उत्पादकांना होतो. जीआय मानांकनामुळे उत्पादकाला अनेक अधिकार प्राप्त होतात. भेसळयुक्त उत्पादन, वस्तू बनविणे किंवा तिची विक्री करणे याला एकप्रकारे आळा घालण्यास देखील मदत होते.
आपल्या राज्याच्या समृद्ध कृषी वारसा आणि पारंपरिक ज्ञानाचा गौरव करण्यासाठी गोव्याने ५ नवीन भौगोलिक संकेतांक (जीआय) टॅग्जची नोंदणी करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हे मानांकन आपल्या शेतकऱ्यांना सक्षम बनवून, स्थानिक जातींचे जतन करून, बाजारपेठेतील ओळख वाढवून आणि ग्रामीण गोव्यात शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करून स्वयंपूर्ण गोवा अभियानाला बळकटी देतील.
गोव्याच्या अद्वितीय उत्पादनांचे संरक्षण करून आणि मूल्यवर्धन करून, हे जीआय मान्यता आर्थिक विकास, कृषी-उद्योजकता आणि ग्रामीण समृद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, तसेच जगासमोर गोव्याची ओळख अभिमानाने दाखवतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.