मडगाव ः शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून किसकोंड-बार्शे येथील सरकारी प्राथमिक शाळेवर बहिष्कार घालण्याचा प्रकार घडला आहे. शाळेच्या मैदानावर मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
मंगळवारी शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असल्यामुळे सकाळीच विद्यार्थी व गणवेश परिधान करून शाळेला जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान, पालकांनी या भागांतील नागरिक आनंद वेळीप यांची भेट घेऊन त्यांचे बांधकाम शाळा चालवण्यासाठी देण्याची मागणी केली आहे. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना वेळीप यांनी त्या बांधकामासह सभोवतालची जमीनही त्यांना मैदानासाठी देण्याचे जाहीर केले आहे.
सरकारी प्राथमिक शाळेत किसकोंडसह, बार्शे तसेच पंचायत क्षेत्राच्या इतर भागांतून अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेण्यासाठी येतात. शाळेच्या आवारात मोबाईलचा टॉवर बसवण्यासाठी हालचाली सुरू होत्या. पण शाळेपासून अवघ्याच काही मीटर अंतरावर उभारलेल्या त्या टॉवरमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असल्याने पालकांनी त्या टॉवरला विरोध केला होता. पालकांच्या विरोधाला गंभीरपणे न घेता शाळेच्या मैदानात टॉवरची उभारणी करण्यात आल्यामुळे पालक वर्गांमध्ये नाराजी असून कोणत्याही स्थितीत त्या ठिकाणी मुलांना पाठवणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
शाळेच्या इमारतीची पडझड झाली असून शाळेच्या आवारात घातलेले मातीचे भराव विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. त्याच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी सरकारने आमच्यावर दबाव आणू नये, अशी मागणी संजय वेळीप यांनी केली आहे. दोन तीन किलोमीटर वरून पायपीट करत शाळेत येणार्या विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी आपले बांधकाम आणि जमीन देण्याचे आनंद वेळीप यांनी मान्य केले आहे. शाळेला येण्यासाठी मुलांना दोन ते अडीच कि.मी. वरून पायपीट करावी लागते. जंगलाचा भाग असलेल्या या परिसरात गवे आणि रानडुकरांचा मुक्त संचार आहे. पावसाळ्यात डोंगरावरून पाण्याचे लोट येत असल्यामुळे मुलांसाठी ती पायपीट धोकादायक ठरू शकते, असे वेळीप म्हणाले.
नुकतेच केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी गावकर्यांची भेट घेऊन त्यांनी सूचवलेल्या आनंद वेळीप यांच्या बांधकामाची पाहणी करून त्या ठिकाणी शाळा उभारून देण्याची मागणी मान्य केली असून, बांधकामाचे साहित्य जागेवर जमा करण्यात आले आहे. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या किंवा आम्ही त्यांना घरीच शिकवू; पण कोणत्याही परिस्थितीत मुलांना त्या शाळेत पाठवले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.