पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कदंब परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पुढील आठवड्यात ३० नवीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली. तुयेकर यांनी सांगितले की, प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुरळीत आणि वेळेवर बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
या नव्या बसेसचा प्राधान्याने वापर ग्रामीण व दुर्गम भागांत केला जाणार असून, ज्या ठिकाणी बससेवा अपुरी आहे किंवा काही गावे अद्यापही सेवापासून वंचित आहेत, त्या भागांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
कदंब महामंडळातील अनेक बसेस १५ वर्षांहून अधिक जुन्या झाल्याने काही मार्गावर बसेसची कमतरता जाणवत होती. त्यामुळे अशा बसेसना टप्प्याटप्प्याने सेवेतून काढून त्यांच्या जागी आधुनिक सुविधांनी सुसज्ज बसेस दाखल केल्या जाणार आहेत. या ताफ्यात डिझेलसोबतच इलेक्ट्रिक (ईव्ही) बसेसचाही समावेश करण्यात येणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यावर सरकारचा भर असल्याचे तुयेकर यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी देखरेख व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.
चालक व वाहक यांच्या कामकाजावर नियमित नियंत्रण ठेवले जात असून, तक्रारींवर तातडीने कार्यवाही केली जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या असून, बससेवा अधिक पारदर्शक व प्रवासीभिमुख करण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे तुयेकर यांनी नमूद केले.
कदंबची तिकीट दरवाढ नाही : तुयेकर
डिझेल दरात वाढ झाली असली, तरी कदंब महामंडळ तिकीट दरात वाढ करणार नाही, अशा शब्दात महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी प्रवाशांना दिलासा दिला. २०२७ मध्ये १५० बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत. यामुळे २०० बससे कमी पडणार आहेत, असेही तुयेकर म्हणाले.