Goa Maze App 
गोवा

Goa Maze App | गोव्यात प्रवास होणार आणखी सोपा! 'माझे अ‍ॅप' लॉन्च, बसपासून रिक्षापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी

Goa Maze App | गोव्यात आता एका अ‍ॅपवर बुक करा बस, रिक्षा आणि बाइक; जाणून घ्या 'माझे अ‍ॅप'ची खासियत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कदंब महामंडळाने सरकारच्या माध्यमातून सुरू केलेले 'माझे अ‍ॅप' राज्यातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असे मत महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी व्यक्त केले. कदंब परिवहन महामंडळाच्या अधिकृत भागीदारीत आणि दिव्यांग व्यक्तींसाठीच्या राज्य आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने विकसित केलेल्या अ‍ॅपचे उद्घाटन पणजीतील पाटो प्लाझा येथील हॉटेलमध्ये झाले.

तुयेकर म्हणाले की, या अ‍ॅपवरून १० भाषांमध्ये वाहनांचे आरक्षण करता येईल. कदंब बसेस, पिंक रिक्षा आणि मोटारसायकल पायलट सेवा उपलब्ध असतील. आरक्षण २४ तासांसाठी ग्राह्य राहणार असून वाहनाचे थेट ठिकाणही समजेल. राज्यात ६०० बसेस असून, त्यापैकी १५० ईव्ही बसेस आहेत.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, सरव्यवस्थापक महेंद्र पेडणेकर, गोवा मोटारसायकल टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम्युअल टिमोथी आणि सहसंस्थापक रिबेका लोबो उपस्थित होते. ग्रेसफुल गोएम सुपरअ‍ॅप प्रा. लि. या गोव्यातील स्थानिक कंपनीने विकसित केलेल्या अ‍ॅपवर बस, मोटारसायकल पायलट आणि रिक्षा सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध आहेत.

चालकांसाठी १५ लाखांचे विमा कवच

पायलट आणि पिंक रिक्षा चालकांना पाच लाखांचा आरोग्य विमा व १० लाखांचा मुदत विमा मिळेल. पहिल्या १०० चालकांना तो मोफत असून दरवर्षी नूतनीकरण होईल. अ‍ॅपवर सक्रिय असेपर्यंत संरक्षण कायम राहील.

अ‍ॅपवरून मिळतील या सुविधा

पुढील टप्प्यात अन्नपदार्थ, किराणा, औषधे, घरगुती सेवा, आरोग्यसेवा, विमान प्रवास, हॉटेल आणि खासगी यॉट आरक्षण उपलब्ध होईल. स्थानिक दुकाने व सेवा पुरवठादारांना जोडण्यावर भर असेल.

पायलट-प्रवासी नाते टिकवण्याचा प्रयत्न

सुरेश ठाकूर म्हणाले की, पायलट-प्रवासी नाते टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पायलटांची संख्या कमी होत असून, बाहेरील राज्यांतील तरुण वाहनांसह येऊन वितरणाचे काम करतात. हे काम स्थानिक पायलटांना मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT