बेकायदा रेती व्यवसायात बाऊन्सर्सचा प्रवेश 
गोवा

गोवा : बेकायदा रेती व्यवसायात बाऊन्सर्सचा प्रवेश

माफियांची अनोखी क्लृप्ती; बांधकाम कंत्राटदारांकडून मोठ्या खर्चाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव ः राज्यातील बेकायदा रेती व्यवसाय बंद पडल्यामुळे बांधकाम व्यवसायावर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. रेती मिळवण्यासाठी बांधकाम कंत्राटदार कितीही पैसे खर्च करण्यास तयार असल्याने मागील दोन वर्षांपासून शांत रेती माफियांनी पुन्हा मान वर काढली आहे.

शेळवण येथील त्या बेकायदा रेती व्यवसायाला अभय देण्यासाठी दक्षिण गोव्यातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या गुंडांना बाऊन्सर म्हणून नेमले होते. इतकेच नव्हे, तर रेती व्यवसायाच्या ठिकाणी प्रवेश करू पाहणार्‍यांचे हात-पाय तोडण्याच्याही सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे शेळवण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळवण येथे बेकायदा रेती व्यवसायाला अभय देण्यासाठी कोलवा मारहाण प्रकरणातील कुख्यात गुंडांना बाऊन्सर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. गाववाडा येथील नदीकिनारी असलेल्या माडाच्या बागायतीत सुमारे दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बेकायदा रेती व्यवसायातून या टोळीने सुमारे 25 लाख रुपये किमतीची रेती चोरल्याचा अंदाज आहे. सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची रेती किनार्‍यावर साठवण्यात आली होती. त्याची विक्री करण्यापूर्वी तपास पथकाने छापाटाकून रेती जप्त केली आहे. त्या व्यवसायापर्यंत कोणी पोहोचू नये, याकरिता कोलवा प्रकरणातील त्या पाच गुंडांना जमिनीच्या संरक्षण कुंपणाजवळ नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या दहशतीमुळे दोन आठवडे तो बेकायदा व्यवसाय कोणत्याही समस्येशिवाय चालू होता.

कोलवा सर्कलजवळ कुख्यात गुंडांच्या दोन गटांत झालेल्या गँगवॉरमध्ये कुलाल नामक गुंडाला जबर मारहाण करण्यात आली होती. कमरेवर दगड मारून प्रतिस्पर्धी गुंडाला जायबंदी करून टाकण्याची घटना सोशल मीडियावर तुफान गाजली होती. त्या घटनेनंतर कोलवा येथे पुन्हा आज दोन्ही गटांमध्ये उफाळून आलेल्या गँगवॉरदरम्यान दोघा गुंडांना भोसकण्याचाही प्रकार घडला होता. या प्रकरणातील सर्व संशयित अट्टल गुन्हेगार असून, मडगाव, मायणा कुडतरी, कोलवा, केपे तसेच उत्तर गोव्यातील विविध पोलिस ठाण्यांत त्यांच्या नावावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. शेळवण येथील रेती व्यवसायाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर त्या अट्टल गुंडांना बाऊन्सर म्हणून तिथे नियुक्त करण्यात आले होते. बेकायदा रेती व्यवसायाचा सर्वत्र गाजावाजा सुरू होता; पण संबंधित बीट पोलिस, पंचायत आणि तलाठ्यांना या प्रकरणाचा सुगावा कसा लागला नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कुडचडे पोलिसांवर राजकीय दबाव

रेती व्यवसायात शीतल नामक महिलेबरोबर, मागील विधानसभा निवडणुकीतील एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराबरोबर पोलिस निरीक्षकाच्या भावाचाही सहभाग आहे. त्या महिलेने आपली राजकीय ओळख दाखवून कुडचडे पोलिसांवर दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने संबंधित जमिनीचा कथित मालक असलेल्या व्यक्तीबरोबर मिळून फिशिंग कंपनी स्थापन केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. मडगावस्थित या महिलेने सत्ताधारी एका नेत्याबरोबर एका पोलिस अधीक्षकाच्या नावाचाही उल्लेख भागीदार म्हणून केला आहे.

संबंधित जमीनमालकावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मी कुडचडे पोलिसांना दिल्या आहेत. पोलिसांनी चौकशी करून संबंधितांना गजाआड करावे.
नाथन अल्मेदा, मामलेदार, केपे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT