Goa Crime News : ड्रग्ज तस्करी, हवाला रॅकेटचा पर्दाफाश Pudhari File Photo
गोवा

Drug smuggling case : ड्रग्ज तस्करी, हवाला रॅकेटचा पर्दाफाश

50 लाखांची रोकड वॉशिंग मशिनमध्ये सापडली, अन्य आरोपींची नावे पुढे येण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोवा आणि हैदराबाद दरम्यान, चालणार्‍या ड्रग्ज तस्करी व हवाला व्यवहारांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई तेलंगणातील अँटी-नार्कोटिक्स ब्युरो (टीएएनबी) आणि गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिळून केली. छापेमारी दरम्यान 49.65 लाखांची रोकड चक्क वॉशिंग मशिनमधून जप्त करण्यात आली आहे.

इमॅन्युएल बेदियाको ऊर्फ मॅक्सवेल या नायजेरियन नागरिकाला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. त्याच्याकडून कोकेन आणि एमडीएमएससारखे 1.25 कोटींचे अमली पदार्थ सापडले. तो 2013 पासून भारतात येत होता. त्याचा गोव्यातील अनेक लोकांशी संपर्क होता आणि ”सेलिब्रिटी कोकेन” म्हणून ओळखले जाणारे महागडे ड्रग्ज तो विकत होता.

तपासात हे स्पष्ट झाले की ड्रग्ज गोव्यातून हैदराबाद, बेंगळुरू आणि केरळमध्ये पाठवले जात होते. यासाठी पर्रा, कळंगुट, शिवोली आणि हणजूण या भागांमध्ये राहणार्‍या नायजेरियन नागरिकांचा वापर होत होता. हे लोक गोव्यात वास्तव्यास होते. ड्रग्ज पॅक करून ते कुरियर किंवा इतर मार्गाने ग्राहकांपर्यंत पोचवले जायचे. पोलिसांनी अशा 40 ग्राहकांची यादीही मिळवली आहे.या प्रकरणात ”संगीता मोबाइल शॉप”चा मालक उत्तम सिंगला अटक करण्यात आली आहे. तो ड्रग्ज विक्रीतून गोळा केलेले पैसे परदेशात, विशेषतः नायजेरियाला हवालामार्गे पाठवण्याचे काम करत होता. तपासात समोर आले की, त्याच्याकडे केवळ दोन दिवसांत 50 लाख रोख जमा झाली होती.

पैसे हवाला पद्धतीने पाठवताना नायजेरियन टोळीने एक अनोखी पद्धत वापरली होती. व्हॉट्सअ‍ॅपवर 5, 10, 20 च्या नोटांचे फोटो पाठवले जात. त्यानुसार एजंट त्या नोटा दाखवून पैसे गोळा करत. या पद्धतीने 150 पेक्षा जास्त व्यवहार करण्यात आले आणि वर्षभरात सुमारे 10 कोटी रुपये परदेशात पाठवले गेले.

तपासात हेही समोर आले की हवाला व्यवहारामागे उत्तम सिंग, राजू सिंग आणि महेंद्र ऊर्फ बॉबी या तिघांचा मुख्य सहभाग आहे. त्यांनी केवळ दोन दिवसांत 50 लाख गोळा केल्याचे पुरावे मिळाले आहेत. या सगळ्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून पोलिसांच्या मते अशा प्रकारचे ड्रग्ज व हवाला नेटवर्क भारतात अनेक ठिकाणी सक्रिय आहेत. यामध्ये अधिक आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पुढील तपासासाठी तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरो (टीजीएएनबी) चे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.

महिनाभरात 4 जणांना अटक

गेल्या महिनाभरात चार नायजेरियन नागरिकांना अटक झाली असून, भारतातील हवाला नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांमधील संबंध उघडकीस आले होते. पोलिसांनी उत्तम सिंगवर पाळत ठेवून 4 जून रोजी छापा टाकला आणि रोकड जप्त केली. म्हापशाजवळील हायलँड पार्क इमारतीतील फ्लॅटमध्ये वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवलेली होती. एका अधिकार्‍याने सांगितले की, जर आमची कारवाई फक्त एक तास उशिराने झाली असती, तर ही रक्कम नायजेरियात पोहोचली असती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT