Speaker Pudhari
गोवा

Noise Pollution Goa | दाबोळीतील ध्वनी प्रदूषण; मानवाधिकार आयोगाकडून दखल

Noise Pollution Goa | प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिखली पंचायतीला नोटीस

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दाबोळी येथील निवासी भागात सुरू असलेल्या स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन वर्कशॉपमुळे होत असलेल्या कथित ध्वनी प्रदूषणाच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत गोवा मानवाधिकार आयोगाने चिखली ग्रामपंचायत आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे. आयोगाने संबंधित प्राधिकरणांना १ जुलै रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दाबोळीमधील फातिमा कॉलनीतील रहिवासी आणि शिक्षक नेवेस लोबो यांनी २१ मे २०२६ रोजी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, निवासी वस्तीच्या मध्यभागी सुरू असलेल्या स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन वर्कशॉपमधून दिवसभर मोठ्या प्रमाणात गोंगाट होत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

लोबो यांनी आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या ९८ वर्षीय आईसोबत राहतात आणि सततच्या आवाजामुळे घरात संवाद साधणेही कठीण झाले आहे. "घरातील भिंती आणि खिडक्या बंद ठेवूनही आवाज कमी होत नाही.

वीजेचा पुरवठाही वारंवार कमी-जास्त होत असल्याने अनेक विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार, संबंधित वर्कशॉपचे काम दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत, तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू असते.

यापूर्वीही एक तक्रार

दरम्यान, याच मुद्द्यावर एका शेजाऱ्यानेही पूर्वी तक्रार दाखल केली होती, मात्र त्यावरही कारवाई न झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणामुळे स्थानिकांत नाराजीचे वातावरण असून, ध्वनी प्रदूषणावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT