Court File Photo
गोवा

Goa High Court | गोवा सरकारला उच्च न्यायालयाचा दणका! प्रतिज्ञापत्रासाठी नऊ महिने विलंब, अधिकाऱ्याला दंड

Goa High Court | वारंवार मुदतवाढ देऊनही झालेल्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाने सामान्य प्रशासन खात्याच्या अवर सचिवांना वैयक्तिक दंड ठोठावण्याचे निर्देश दिले.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राजधानी पणजीतील जुन्ता हाऊस इमारतीच्या व भाडेपट्टीच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यास नऊ महिने विलंब केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. वारंवार मुदतवाढ देऊनही झालेल्या विलंबाबद्दल उच्च न्यायालयाने सामान्य प्रशासन खात्याच्या अवर सचिवांना वैयक्तिक दंड ठोठावण्याचे निर्देश दिले. येत्या ४ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे अंतिम निर्देश देत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबरला ठेवली आहे.

उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेत सामान्य प्रशासन खात्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ मागितली. ती देण्यात आली तरी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास उशीर केला जातो याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. न्यायालयाच्या आदेशांचे पालन अधिकाऱ्यांकडून केले जात नाही, असेच दिसून येते. सरकारकडून स्पष्ट भूमिका मांडली जात नाही याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

जुन्ता हाऊस इमारत खाली करण्याच्या सूचनेनंतर या इमारतीत असलेल्या गाळेधारकांनी सरकारला पर्यायी व्यवस्थेची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने यतीन पारेख यांच्यासह तिघांनी स्वतंत्र याचिका सादर केल्या. या याचिकांवर सुनावणीदरम्यान, १४ जानेवारी व ११ फेब्रुवारीपासून आतापर्यंत तब्बल सहा वेळा मुदतवाढ देऊनही राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. त्यामुळे खंडपीठाने सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

सरकारी अधिकारी न्यायालयाचे आदेश हलक्यापणाने घेतात. अधिकाऱ्यांनी या पाडण्यात येणाऱ्या इमारतीतील गाळेधारकांच्या व्यवस्थेबाबत तातडीने निर्णय घेण्याऐवजी तो ताटकळत ठेवला जात आहे. प्रकरण वर्षभर प्रलंबित ठेवून वादग्रस्त इमारत तशीच उभी राहू देता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले.

सरकारने पुनर्विकसित इमारतीत समतुल्य बांधकाम क्षेत्र देऊन बाधित दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. या आश्वासनामुळेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बजावण्यात आलेल्या नोटिसांविरोधातील यापूर्वीचे कायदेशीर आणि लवाद दावे मागे याचिकाकर्त्यांनी मागे घेतल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सरकारच्या कामकाज नियमानुसार औपचारिक मान्यता मिळत नाही तोपर्यंत समितीच्या इतिवृत्ताला सरकारचा बंधनकारक निर्णय मानता येणार नाही, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली. भाडेपट्टीची मुदत संपणे आणि कराराच्या अटींचे कथित उल्लंघन हे दिवाणी व कराराशी संबंधित वाद असल्याने ते याचिका अधिकारक्षेत्राच्या कक्षेबाहेर आहेत, अशी भूमिका घेतली.

९ हजार रुपयांचा ठोठावला दंड

उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होत नसल्याने सरकारच्या भूमिकेवर असमाधान व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याला ९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे ठरवले. मात्र, त्यानंतर तीन याचिकाकर्त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड स्वरूपात स्वतःच्या खिशातून अवर सचिवाने द्यावेत असा आदेश दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT