Goa Bench of Bombay High Court 
गोवा

Goa High Court | "स्वतःच्या घरात शांततेने जगणे हा पालकांचा हक्क!"; छळ करणाऱ्या मुलगा-सुनेची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goa High Court | मुलगा-सुनेला घर खाली करण्याचे खंडपीठाचा निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वृद्ध आई-वडिलांनी छळ, मारहाण, धमक्या आणि मानसिक त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या घरात मुलगा व सुनेला राहण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मुलगा व सुनेची याचिका फेटाळली.

न्यायालयाने म्हटले की, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरात शांततेने व सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी आवश्यक असल्यास मुलगा व सुनेला घर खाली करण्याचे आदेश देता येतात.

या प्रकरणात उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (अपीलीय प्राधिकरण) वरिष्ठ नागरिकांच्या बाजूने निर्णय देत मुलगा व सुनेला एका महिन्याच्या आत घर रिकामे करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, वृद्ध दाम्पत्य आणि मुलगा-सुनेमध्ये सातत्याने वाद होत असल्याने एकत्र राहणे शांततापूर्ण जीवनासाठी अनुकूल नाही.

त्यामुळे मुलगा व सुनेने पर्यायी भाड्याच्या निवासस्थानी राहावे. मात्र, त्यांना त्यांच्या वैयक्तिक सामानासाठी घरातील एका खोलीत प्रवेश करण्याची मर्यादित परवानगी देण्यात आली आहे. तसेच वृद्ध पालकांना कोणत्याही प्रकारे त्रास, धमकी किंवा छळ करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

नोंदीनुसार, विवाहानंतर मुलगा व सून काही काळ पालकांसोबत राहिले होते. त्यानंतर ते वेगळे राहू लागले आणि पुन्हा काही वर्षांनी पालकांच्या विनंतीवरून वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर घरी परतले. मात्र, त्यानंतरही घरातील वाद वाढल्याचा आरोप वृद्ध पालकांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT