पणजी : सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी पणजीतील रस्ते जलमय झाले होते. गेल्या २४ तासांत पणजीत तब्बल ५५ मिलिमीटर पाऊस पडला. राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली.
सावरधाट-उसपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर एका घरावर झाड कोसळले. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा बचाव पथकाने झाड हटवून परिसर साफसफाईचे काम केले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र मालमत्तेचे नुकसान झाले. होंडा पोस्तवाडा येथे फणसाचे भले मोठे झाड मुळासकट उन्मळून पडले.
या घटनेत एका दुकानाचे मोठे नुकसान झाले. दवर्ली येथील रुमडामळ परिसरात एक मोठे वडाचे झाड उन्मळून थेट घरावर कोसळले. डिचोली तालुक्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने जोर कायम राखल्याने अनेक भागांत पडझडीच्या घटना घडल्या. पिसुर्ले, भुईपाल येथे झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. पाटो पणजी येथे तर रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
शेतकरी सुखावला
दिवसभरात अधूनमधून पावसाने उसंत घेतल्याचेही चित्र होते. भारतीय हवामान विभागाच्या गोवा कार्यालयाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्या अंदाजानुसार राज्यात पावसाने हजेरी लावली होती. काही दिवस दडी मारलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यांनी पेरणीची कामे सुरू केली.