गोवा

Goa Health news | 'आरोग्य' अ‍ॅक्शन मोडवर; अतिसार आटोक्यात

मंत्री विश्वजित राणे : इमारत परिसरातील पाण्याची दररोज तपासणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : दाबोळीमधील अतिसाराच्या वाढत्या प्रकरणांची दखल आरोग्य खात्याने घेतली आहे. दाबोळी येथील सदर इमारतीच्या परिसरातील पाण्याची दररोज तपासणी केली जात आहे. तेथील लोकांना मोठ्या प्रमाणात ओआरएस उपलब्ध करून देण्यात आले आहे. लोकांनी पाणी उकळून प्यावे, आरोग्य खाते सतर्क झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. प्रकरणाची दखल घेऊन यंत्रणेने तातडीने उपाययोजना सुरू केल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

दाबोळी येथील एका इमारतीमधील सुमारे १५० नागरिकांना गढूळ पाण्यामुळे अतिसार झाल्याने खळबळ उडाली होती. याबाबत आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, तीव्र अतिसाराच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, एफडीए व पेयजल पुरवठा खाते यांच्या सहकार्याने, आरोग्य खाते, चिखलीतील उपजिल्हा इस्पितळ संयुक्त आणि समन्वित कारवाई सुरू केली आहे. घरोघरी जाऊन पाहणी करण्याबरोबरच, पाण्याच्या स्रोतांची आणि आजूबाजूच्या परिसराची सविस्तर तपासणी केली जात आहे. यंत्रणेचे बारकाईने लक्ष असून रहिवाशांनी उकळलेले पाणी पिण्यासह आवश्यक खबरदारीचे पालन करावे, असे मंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले आहे.

अतिसार रुग्णांची तब्येत सुधारतेय

बंद सांडपाणी प्रकल्पामुळेच पाणी प्रदूषित; जिल्हाधिकारी क्लिटस यांची माहिती

मडगाव : दाबोळी येथील प्रभू व्हायोलेट कॉम्प्लेक्समधील १५६ जणांना तीव्र अतिसाराची लागण होण्यास बंद पडलेला तो सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जबाबदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रहिवासी इमारतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बऱ्याच काळापासून बंद आहे. त्यामुळे प्रदूषित पाणी भूगर्भातील पाण्यात जाऊन मिसळले. तेच प्रदूषित पाणी बोअरवेलच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांनी पिण्यासाठी वापरल्यामुळे १५६ जणांना अतिसाराची लागण झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आरोग्य खात्याने घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यातून खरे कारण समोर आले आहे. लागण झालेल्या त्या सर्व रहिवाशांची तब्येत आता सुधारत असून, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एश्रा क्लिटस यांनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दरम्यान, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रभू व्हायोलेट कंपनीच्या मालकांना अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५६ लोकांच्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. १२ मार्च रोजी जुलाबाचे पहिले प्रकरण या इमारतीत समोर आले होते. एकाच आठवड्यात तो आकडा ५६ वर पोहोचला होता. सध्या जुलाबाची साथ लागलेल्या एकूण लोकांची संख्या १५६ वर पोहोचलेली आहे.

जिल्हाधिकारी एश्रा क्लिटस यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ५ ब्लॉकमध्ये विभागलेल्या या रहिवासी इमारतीत एकूण १२८ सदनिका आहेत. आरोग्य खात्याने केलेल्या तपासणीत अ क्रमांकाची इमारत वगळता इतर सर्व ब्लॉकमध्ये अतिसाराचे रुग्ण खात्याला आढळले होते. बुधवारी अतिसाराचा एकच रुग्ण मिळालेला होता; पण गुरुवारी एकही रुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांना आढळला नाही. त्यामुळे ही साथ आता नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

त्यांना डिस्चार्ज, तो अहवालही नकारात्मक

लक्षणे असलेल्यांना औषधोपचार करून घरी पाठवले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पाण्याची टाकी, जलतरण तलाव व इतर काही ठिकाणांतून आरोग्य खात्याने पाण्याच्या चाचणीसाठी नमुने घेतले होते. त्यांचा अहवाल नकारात्मक आलेला आहे; पण गार्डन पाईप व बोअरवेलचे पाणी प्रदूषित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना गोवा प्रदूषण मंडळाने सदर बिल्डरला दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT