CM Pramod Sawant 
गोवा

CM Pramod Sawant | गोव्यातील स्थानिक कारागिरांना मोठा दिलासा! 'गोवा हाट' अन् 'कुणबी ग्राम'चे डिसेंबरपर्यंत उद्घाटन

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : 'स्वयंपूर्ण गोवा'वर विविध घटकांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मला-नेवगी नगर येथील गोवा हाट कम्युनिटी हॉल आणि सांगे येथील कुणबी ग्रामचे उद्घाटन डिसेंबर २०२६ पर्यंत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या दोन्ही ठिकाणी स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना प्रदर्शन व विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असून, त्यांना चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यटकांसाठीही ही नवीन आकर्षणे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी 'स्वयंपूर्ण गोवा' या विषयावर विविध घटकांशी आभासी पद्धतीने संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गोव्याच्या कारागिरांना सक्षम करूनच 'स्वयंपूर्ण गोवा'चे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पारंपरिक कौशल्ये आणि व्यवसाय जपणाऱ्या गोव्यातील कारागिरांना सक्षम करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

पेडणेपासून काणकोणपर्यंत विविध भागांतील कारागिरांकडे पारंपरिक कौशल्यांचा मोठा ठेवा आहे. त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारकडून कौशल्य विकास, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि आवश्यक ते इतर सहकार्य दिले जात असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोव्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत आतापर्यंत १८ हजार ५७५ जणांना लाभ मिळाला आहे. या लाभार्थ्यांना टूलकिटसह सुमारे १० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

८ हजारांहून अधिक महिला कारागीर प्रशिक्षित

२०१४ पासून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक महिला कारागिरांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कालावधीत विविध ठिकाणी ५२ प्रशिक्षण कार्यक्रम आणि वर्ग आयोजित करण्यात आले. त्यातून महिलांना कुशल कारागीर बनण्यास मदत झाली असून, ही सरकारसाठी मोठी उपलब्धी असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना नकार द्या

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्तीऐवजी मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना केले. गोव्यातील ४०० हून अधिक गणपती मूर्तिकारांना मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी माती मिसळण्याची यंत्रे तसेच अनुदानाच्या माध्यमातून सरकारकडून मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सावंत म्हणाले की, गोमंतकीयांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी मातीच्या गणपती मूर्ती आपल्या घरी आणाव्यात. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरणे बंद केले, तर त्यांची मागणीही आपोआप कमी होईल. गणेश चतुर्थीचा सण अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT