Extra Teachers Adjustment Pudhari
गोवा

Goa Government | गोवा सरकारचा शिक्षकांना मोठा दिलासा; गंभीर आजारासाठी आता मिळणार इतक्या दिवसांची सवेतन रजा

Goa Government | राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; खात्याकडून परिपत्रक जारी

पुढारी वृत्तसेवा

पणजीः पुढारी वृत्तसेवा

गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या शासकीय व अनुदानित शाळांतील नियमित शिक्षकांसाठी गोवा सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. टर्मिनल (अंतिम टप्प्यातील) आजारांचे निदान झालेल्या शिक्षकांना आता ३६५ दिवसांपर्यंत पूर्ण वेतनासह विशेष वैद्यकीय रजा देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

गोवा शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या सर्व नियमित शिक्षकांना ही योजना लागू राहणार असून, गोवा, दमण व दीव शालेय शिक्षण अधिनियम १९८४ व नियम १९८६ तसेच सीसीएस (रजा) नियम १९७२ अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

या धोरणानुसार अंतिम टप्प्यातील कर्करोग, मूत्रपिंड, यकृत वा हृदयाचे अंतिम टप्प्यातील आजार, एएलएस तसेच प्रगत न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार यांचा टर्मिनल आजारांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

संबंधित आजाराचे प्रमाणपत्र अधिकृत शासकीय वैडाकीय प्राधिकरणाकडून घेणे अनिवार्य असणार आहे. अशा गंभीर आजारांनी त्रस्त शिक्षकांना ३६५ दिवसांपर्यंत पूर्ण वेतनासह रजा मिळणार असून, गरज भासल्यास शासकीय वैद्यकीय मंडळाच्या शिफारसीनंतर व सरकारच्या मंजुरीने ही रजा वाढविण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

रजा मिळविण्यासाठी शिक्षकांनी आपल्या शाळेच्या प्रमुखांकडे अर्ज सादर करावा लागेल. त्यासोबत गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी किंवा अन्य मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

शाळा प्रमुख अर्ज शिक्षण संचालनालयाकडे तपासणी व मंजुरीसाठी पाठवतील. आवश्यक असल्यास प्रकरण शासकीय वैद्यकीय मंडळाकडेही पाठविले जाऊ शकते. या विशेष रजेच्या कालावधीत शिक्षकांची सेवा ज्येष्ठता, सेवा सलगता, निवृत्तीवेतन लाभ तसेच इतर हक्क अबाधित राहणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT