पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्यटनासोबतच गोवा देशाची क्रिएटिव्ह कॅपिटल करण्यावर गोवा सरकारचा भर आहे. आज सोमवारी झालेल्या आयटीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याच विषयावर चर्चा झाली. आजच्या बैठकीमध्ये राज्यातील १५ कंपन्यासाठी प्रत्येकी १० लाखांचे अनुदान तसेच चार महाविद्यालयात एक्युबीशन सेंटर स्थापन करण्यासाठी प्रत्येकी १० लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले,
अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. यावेळी आयटी खात्याचे संचालक कबीर शिरगावकर व इतर अधिकारी उपस्थित होते. खंवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयटी खात्याच्या उच्चाधिकार समितीची बैठक पर्वरी मंत्रालयात झाली.
२०२५ चा स्टार्टअप धोरण २०१७ चे आयटी धोरण स्थनिकांना जास्त लाभदायी कसे ठरेल, यावर भर देण्यात आला. या धोरणांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुणांनी स्वयंरोजगार स्थापन करावेत, उद्योग स्थापन करावेत, यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरले.
गोवा सरकारच्या स्टार्ट अप धोरणाचा लाभ घेऊन आतापर्यंत ८०३ स्टार्टअप स्थापन झाल्याचे खंवटे यांनी सांगितले. इनोव्हेशन (नवसंकल्पना) साठी अनेकजण पुढे येत आहेत. त्यांच्यासाठी यंत्र उपलब्ध करून देतानाच अनुदान देणे, जागा उपलब्ध करणे अशा विविध पायाभूत सुविधा गोवा सरकार गोव्यातील युवकांना पुरवत आहे.
गोवेकरांनी स्टार्ट अपमध्ये आपली क्षमता दाखवलेली आहे. कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन अनेकजण या क्षेत्रात उतरले आहेत. असे उद्योग सुरू करणाऱ्यांना १० लाख रुपयापर्यंत अनुदानाच्या रूपात आर्थिक मदत केली जात असल्याचे सांगून १५ कंपन्यासाठी अनुदान मंजूर केल्याचे खंवटे म्हणाले.
एक्युबेशन केंद्र स्थापनेसाठी १० लाखांचे अनुदान
राज्यातील दोन खासगी आणि दोन सरकारी महाविद्यालयांना एक्युबेशन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचे अनुदान देण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आयटी धोरण आणि स्टार्टअप धोरण संलग्न करून अनेकाकडून या धोरणाचा लाभ घेतला जात असल्याचे सांगत विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७ चे ध्येय साध्य करण्यासाठी गोव्याचे आयटी खाते सक्रियपणे काम असल्याचे खंवटे म्हणाले.