CM Pramod Sawant pudhari photo
गोवा

CM Pramod Sawant | गोवेकरांना फक्त 5 हजारांत मिळणार सरकारी फ्लॅट; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा

CM Pramod Sawant | राज्यातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर नाही. ज्यांचे कुटुंब पोर्तुगीज काळापासून गोव्यात राहते.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर नाही. ज्यांचे कुटुंब पोर्तुगीज काळापासून गोव्यात राहते. अशा नागरिकांना फक्त पाच हजार रुपये भरून ३० वर्षांसाठी सरकार फ्लॅट उपलब्ध करणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदीसाठी चार टक्के व्याजावर ३५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

पर्वरी येथील मंत्रालयात गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मूळ गोवेकरांना ३० वर्षांचा निवासी दाखला दिल्यानंतर व ज्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे अशा लोकांना सरकार फ्लॅट देणार आहे.

गोवा गृहनिर्माण मंडळ आणि पुनर्वसन मंडळ यांच्या संयुक्तपणे विविध ठिकाणी फ्लॅट उपलब्ध केले जातील, हे फ्लॅट ३० वर्षांसाठी लीजवर दिले जाणार आहेत. कारण कुणी ते विकू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घर बांधणी किंवा फ्लॅट खरेदीसाठी ४ टक्के व्याजावर ३५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाईल.

सरकारी कर्मचाऱ्यांसह सरकारी महामंडळाचे कर्मचारी व पत्रकारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या ज्यांची घरे बांधणी चालू आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून किमान पाच वर्षांची सेवा या योजनेसाठी हवी, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मच्छीमार विज्ञान महाविद्यालयासाठी २० पदांची निर्मिती, आदिवासी कल्याण खात्यासाठी ६ पदांची मान्यता व एससी, एसटी, आर्थिक विकास महामंडळासाठी ९ पदांना मान्यता हे निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

सदनिकांसाठी पात्रता

  • पारंपरिक गोमंतकीय कुटुंबे : वडील किंवा आजोबा यांचा जन्म गोव्याच्या मुक्तीपूर्वी झालेला असणे आवश्यक.

  • अर्जदाराची अट : स्वतःच्या नावावर घर किंवा सदनिका नसावी.

  • सदनिकांसाठी शुल्क : केवळ पाच हजार रुपये.

  • सदनिकांचे स्वरूप : मालकी हक्काऐवजी भाडेपट्ट्यावर वितरण.

  • सध्याची उपलब्धता : गृहनिर्माण मंडळाकडे सुमारे १५० सदनिका.

  • नवीन बांधकाम : गरजेनुसार सर्व तालुक्यांत सदनिका उभारणार.

  • कर्मचाऱ्यांसाठी कर्ज : चार टक्के व्याजदराने कमाल ३५ लाख रुपये.

  • पात्रता : पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेले सरकारी, महामंडळे व स्वायत्त संस्थांचे कर्मचारी.

  • खासगी क्षेत्र : पुढील टप्प्यात योजनेचा विस्तार करण्याचा सरकारचा विचार.

एस.टी.साठी आज प्रतिज्ञापत्र सादर करणार

राज्यातील एस.टी. बांधवांना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सरकार गंभीर आहे. १०० टक्के सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाची स्थगिती न उठवता उच्च न्यायालयाला सुनावणी करण्यास सांगितले आहे. गोवा सरकार व केंद्र सरकार आणि आदिवासींच्या एका संघटनेने याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता उच्च न्यायालयाला केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

गोवा सरकार शुक्रवारी, दि. २७ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करेल. तसेच मिशन एस.टी. पॉलिटिकल रिझर्व्हेशनही करेल. उच्च न्यायालयाला २४ डिसेंबरपर्यंत निर्णय देण्यास सांगितले गेले आहे. आपणाला विश्वास आहे की, येत्या निवडणुकीत आदिवासींसाठी निश्चितपणे राजकीय आरक्षण मिळेल. असे सांगून राजकीय आरक्षण मिळाले नसले तरीही भाजपने मागील विधानसभा निवडणुकीत पाचपेक्षा जास्त जागी एस.टी. उमेदवार दिले होते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT