CM Pramod Sawant 
गोवा

CM Pramod Sawant| सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

फोंडा येथे सरकार तुमच्या दारी उपक्रमावेळी ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : फोंड्यांतील आयडी उपजिल्हा इस्पितळात न्यूरोसर्जन कुणी यायला तयार असेल तर सांगा. सध्या कुणीच यायला तयार नसून न्यूरोसर्जनची नियुक्ती करण्याबरोबरच सीटीस्कॅनची व्यवस्थाही करू, असे सांगताना फोंड्याचे दिवंगत आमदार रवी नाईक यांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास धरला. तो पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्यात बोलताना दिली.

फोंड्यांतील राजीव गांधी कला मंदिरात शुक्रवारी (दि. ६) बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, सरकार जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच आरोग्याचीही काळजी घेण्यास कटिबद्ध आहे. आरोग्य सुदृढ राहायचे असेल तर आधी स्वच्छता हवी आहे. स्वच्छतेवरच सरकार वर्षाला ५०० कोटी रुपये खर्च करते. तरीही लोक कचऱ्याची समस्या तयार करतातच. म्हणून स्वच्छता ही महत्त्वाची आहे, याचे भान ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, फोंडा नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, राजीव गांधी कला मंदिरचे अध्यक्ष रितेश नाईक, इतर नगरसेवक व सरकारी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, फोंड्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न रवी नाईक यांनी पाहिले, त्याची पूर्तता करण्यात येईल. यावेळी फोंड्यांतील ॲग्री बाजार प्रकल्पात नव्याने उभारण्यात आलेल्या सोलर वीज प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

...म्हणूनच ‘सरकार तुमच्या दारी’

जनतेच्या समस्या रेंगाळत राहू नयेत, यासाठी सरकार तुमच्या दारी हा उपक्रम हाती घेतला. आता राज्यातील बाराही तालुक्यांत अशा प्रकारचे उपक्रम होतील, असे सांगताना सरकारने कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर दिला आहे, कुशल युवक हा उद्याच्या समृद्ध देशाचा खांब आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

बेकायदा रेतीचे ट्रक अडवू : डॉ. भाटीकर

सरकार तुमच्या दारी या उपक्रमात रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी काही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यात फोंड्यांतील आयडी इस्पितळातील उपकरणांची कमतरता तसेच राजीव गांधी कला मंदिरावर समिती सदस्यपदी जाणकार कलाकारांची निवड करण्याबरोबरच महिला प्रतिनिधी निवडणे, या प्रश्नांबरोबर खांडेपार येथून रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रेतीवाहू ट्रकांचा समावेश होता. पोलिस हे ट्रक रोखणार नसतील तर आम्ही रोखू, असा इशारा भाटीकर यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT