Pre Marital Counselling Centres Goa Cm Pramod Samant
पणजी : पुढारी वृत्तसेवा
वैवाहिक नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि घटस्फोटांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी गोव्यात विवाहपूर्व समुपदेशन केंद्रें सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नोंदणी खात्यातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नोंदणी दिन सोहळ्यात बोलताना केली.
ते म्हणाले, विवाहापूर्वी जोडप्यांना समुपदेशन देऊन वैवाहिक जीवनातील संभाव्य अडचणी, जबाबदाऱ्या आणि परस्पर समज याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे विवाहानंतर निर्माण होणारे मतभेद कमी करण्यास, दांपत्यामधील संवाद आणि समन्वय वाढविण्यास मदत होईल.
डेस्टिनेशन वेडिंगसाठी गोव्याची निवड करणाऱ्या जोडप्यांसाठी विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गोव्यात विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र सहज उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी खात्यामार्फत विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबरोबरच नागरिकांना राज्यातील कोणत्याही विवाह नोंदणी केंद्रावर विवाहाची नोंदणी करता येणार आहे. विवाहपूर्व समुपदेशनाची सुविधा राज्यभर उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयामुळे विवाह संस्था बळकट करण्याबरोबरच कुटुंबातील स्थैर्य वाढविण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
एन्कम्ब्रान्स सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी मॉड्यूलमध्ये अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. आता एन्कम्ब्रान्स सर्टिफिकेट मिळवण्याची सुविधा अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न असून, राज्याबाहेर किंवा परदेशातूनही संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.
राज्यामध्ये विवाह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगसाठी गोव्याची निवड करणाऱ्या जोडप्यांसाठी विवाह नोंदणीची सुविधा अधिक सोपी आणि सुलभ केल्यास राज्यातील डेस्टिनेशन वेडिंग क्षेत्राला आणखी चालना मिळेल, असा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
या निर्णयामुळे विवाहाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच हॉटेल, रिसॉर्ट, इव्हेंट मॅनेजमेंट, केटरिंग आणि इतर संबंधित व्यवसायांना फायदा होण्याची शक्यता आहे.
गोव्याला आंतरराष्ट्रीय आणि देशंतर्गत डेस्टिनेशन वेडिंगचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना या सुविधेमुळे बळ मिळणार आहे. ते म्हणाले, गोव्यातील नोंदणी खात्याच्या विविध कार्यालयांसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, कार्यालयांच्या आधुनिकीकरण आणि सेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बांदोडा कार्यालयासाठी नवीन जागा निश्चित केली आहे.
पेडणे कार्यालयासाठीही नवीन जागा मिळाली आहे, डिचोली येथे हाऊसिंग बोर्डाच्या नवीन इमारत कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाळपई येथे कृषी कार्यालयात असलेल्या इमारत कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याशिवाय केपे येथे जलस्रोत खात्याकडून नवीन कार्यालय उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.