पणजी : पुढारी वृत्तसेवा
कला आणि संस्कृती खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या 'कला गौरव पुरस्कार' आणि 'कला वृद्धी' पुरस्काराच्या कलाकारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा कला गौरव पुरस्कारासाठी २० कलाकार तर कला वृद्धीसाठी १० कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. कला गौरव पुरस्कारासाठी ६० वर्षे पूर्ण केलेल्या कलाकारांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
यात पुरस्कार विजेत्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रशंसापत्र आणि प्रत्येकी २५,००० रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित केले जाईल. यावर्षी नाट्य क्षेत्रासाठी अनिल फळदेसाई (काणकोण), डॉ. व्यंकटेश हेगडे (सासष्टी), नारायण गोवेकर (डिचोली), प्रेमनाथ धारगळकर (पेडणे) आणि उमेश नाईक (फॉडा) यांना, साहित्य क्षेत्रासाठी कविता बोरकर (सासष्टी) व पुष्पा गायतोंडे (सासष्टी),
तियात्रमध्ये जोस परेरा (सासष्टी), लुईसिन्हा तोमा सिन्हा जसिता फर्नाडिस ऊर्फ लुईझा फर्नांडिस (केपे) आणि लोरेन्स ग्रासिएस (सासष्टी), भजन क्षेत्रासाठी सहदेव लक्ष्मण परब (पेडणे), व्यंकटेश सिमेपुरुषकर (बार्देश) व कीर्तीमालिनी च्यारी (डिचोली), संगीत क्षेत्रात हेमंत नाईक (सासष्टी) व दयानंद मांद्रेकर (तिसवाडी), लोककलासाठी प्रमिला पणजीकर (बार्देश) व सातू माजिक (सत्तरी), हस्तकला क्षेत्रासाठी प्रेमानंद च्यारी (काणकोण) व शंकला च्यारी (तिसवाडी) यांना, तर नृत्य क्षेत्रासाठी शोभा धामस्कर (सासष्टी) यांना कला गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कला व संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ४० ते ६० वर्षे वयोगटातील कलाकारांना 'कला वृद्धी पुरस्कार' पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी साहित्य, तियात्र, भजन, संगीत, लोककला, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला आणि नाट्य या विविध क्षेत्रांतील दहा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक पुरस्कारार्थीस स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रु. २५,००० इतकी रोख रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
यंदा साहित्य क्षेत्रातील भूषण भावे (फोंडा), तियात्र क्षेत्रातील ऑगी डिमेलो (बार्देश), भजन क्षेत्रातील स्मिता मांद्रेकर (डिचोली), संगीत क्षेत्रातील पूर्णानंद च्यारी (सासष्टी), लोककला क्षेत्रातील दत्ताराम सावंत (डिचोली), हस्तकला क्षेत्रातील सोनाली शेटगावकर (पेडणे), चित्रकला क्षेत्रातील राजमोहन शेट्ये (पेडणे), शिल्पकला क्षेत्रातील नवसो परवार (सत्तरी) तसेच नाट्य क्षेत्रातील एकनाथ नाईक (फोंडा) आणि उमेश बांदोडकर (सासष्टी) यांचा समावेश आहे.