गोवा

Goa news | कुंपणासाठी शेतकऱ्यांना ५ वर्षांत १० कोटींचे अनुदान

सत्तरी, काणकोणचे शेतकरी आघाडीवर : सौरऊर्जेवरील कुंपणांचीही उभारणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्यातील पिकांच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्यासाठी मागील ५ वर्षांत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना १०.४० कोटी रुपयांहून अधिक अनुदानाचे वाटप केले आहे. वन्य प्राणी आणि मोकाट गुरांपासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सत्तरी आणि काणकोण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा सर्वात जास्त लाभ घेतल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे.

कृषी खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सत्तरी तालुका अनुदान मिळवण्यात सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या तालुक्यातील ९५ लाभार्थ्यांनी एकूण ८८.८९ लाख रुपयांचे अनुदान घेतले. २०२१-२२ मध्ये हा आकडा केवळ ७.१५ लाख रुपये इतका होता, जो आता अनेक पटींनी वाढला आहे. येथील शेतकऱ्यांनी साध्या कुंपणासोबतच दगडाची भिंत बांधण्यावरही भर दिला आहे.

राज्यात पिकांच्या संरक्षणासाठी चॅनलिंग कुंपणाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. २०२४-२५ या वर्षात वाटप झालेल्या एकूण २.८७ कोटी रुपये अनुदानापैकी १.८४ कोटी रुपये केवळ चॅनलिंग कुंपण घालण्यासाठी वापरले गेले. काणकोण तालुक्यातील ४८ शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी सुमारे ४९.५९ लाख रुपयांचे अनुदान याच कामासाठी घेतले आहे. पारंपारिक कुंपणासोबतच काही तालुक्यांनी आधुनिक सौर ऊर्जा कुंपण बसवण्याचा प्रयत्न केला होता. फोंडा तालुक्यात २०२२-२३ मध्ये १७ लाभार्थ्यांनी यासाठी १७.९९ लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. मात्र, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आतापर्यंत सौर ऊर्जा किंवा हायब्रिड कुंपणासाठी एकही अर्ज आलेला नाही वा अनुदान दिले गेलेले नाही.

उत्तर गोव्यातील डिचोली आणि बार्देश तालुक्यात अनुदानाचे प्रमाण चांगले असले तरी, मुरगाव तालुक्यात मात्र या योजनेला कमी प्रतिसाद दिसून येत आहे. मुरगावमध्ये मागील ५ वर्षांत फक्त एकाच लाभार्थ्याने अनुदान घेतले. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्यातील १७५ शेतकऱ्यांना १.६७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा...

राज्य पुन्हा कृषीसंपन्न करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. पडिक जमीन पुन्हा लागवडीखाली यावी आणि राज्यात कृषी उत्पन्न वाढावे, यासाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून युवकांनी शेतीकडे वळावे. वन्यप्राणी आणि मोकाट जनावरांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना कुंपणासाठी अनुदान दिले जात आहे. या योजनेला शेतकरी लाभ घेत असून यातून राज्यातील शेती पूर्ण सुरक्षित राहण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT