file photo
गोवा

कायद्यानुसार भीक देणे हा गुन्हाच

खंडपीठाचे निरीक्षण : भिकारी समस्येसाठी एनजीओची मदत घेण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्यातील शहरांमध्ये वाढत्या भिकारी समस्येसंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायद्यानुसार भिकाऱ्यांना पैसे देणे हे गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा विचार करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी २३ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.

अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार, गोव्यात आढळणारे बहुतांश भिकारी हे स्थानिक नसून शेजारील राज्यांमधून येणारे आहेत. विशेषतः पर्यटन हंगामात तसेच सणासुदीच्या काळात त्यांची संख्या वाढते. गरिबी रोजगाराच्या आणि अभावामुळे हे लोक गोव्यात येऊन भीक मागतात, असे त्यांनी नमूद केले.

खंडपीठाने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने एखाद्या सक्षम स्वयंसेवी संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित केली. त्यासाठी राज्यातील भिकाऱ्यांची अचूक माहिती संकलित करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले. तसेच भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने सुचविले.

उत्तर व दक्षिण गोवा बालकल्याण समिती तसेच समाजकल्याण खात्याने मुलांकडून भीक मागविणाऱ्या पालकांविरुद्ध आतापर्यंत किती कारवाई झाली, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बालभिकारी प्रकरणांकडे गांभीर्याने पाहून त्यांचे शिक्षण व पुनर्वसन यावर भर देणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

दरम्यान, भीक मागण्याच्या प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने विविध एनजीओंच्या सहकार्याने जनजागृती मोहीम राबवावी, असेही न्यायालयाने सुचविले. याचिकादार मोसेस पिंटो यांनी काही स्वयंसेवी संस्थांची माहिती पुढील सुनावणीवेळी सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.

तज्ज्ञांच्या मते, केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून पुनर्वसन, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती यांवरही भर देणे आवश्यक आहे. यामुळे भिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अॅडव्होकेट जनरलनी ऐकवला किस्सा...

सुनावणीवेळी अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी किस्सा सांगितला. काही दिवसांपूर्वी ते पणजीतील एका हॉटेलातून बाहेर पडत असताना एक लहान मुलगा भीक मागण्यास समोर आला. सकाळपासून उपाशी असल्याचे तो सांगू लागला. त्याने पैशाची मागणी केली. अशावेळी त्या मुलाकडे पाहून भाऊक झालो. त्याला खाद्यपदार्थ दिला तर नको असतो तर त्यांना पैसे हवे असतात. कारण त्यांच्याकडे जमा होणाऱ्या पैशांवर त्यांच्या पालकांचा किंवा ज्यांनी त्याना भीक मागण्यास आणलेले असते त्याचा डोळा असतो. ही समस्या सोडवणे मोठे कठीण काम आहे असे त्यांनी सांगितले.

तंबी दिल्यानंतरही मागतात भीक...

राज्यातील प्रमुख शहरे तसेच बाजारपेठा या भागात मुले व त्यांचे पालक भीक मागताना आढळतात. एखाद्या नागरिकांनी फोन केला तर पोलिस त्यांना स्थानकात बसवून ठेवतात. संध्याकाळी त्यांना तंबी देऊन सोडून देतात. मात्र, असे भिकारी दुसऱ्या दिवशी पुन्हा भीक मागतात दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT