goa news  
गोवा

Goa GI Tag | गोव्याच्या 'पावपोळी'ला मिळणार जागतिक ओळख! जीआय मानांकनासाठी 3 नवीन प्रस्ताव सादर

Goa GI Tag | विज्ञान, तंत्रज्ञान मंडळ करणार प्रस्ताव सादर; यापूर्वी १५ वस्तूंना मानांकन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

याआधी १५ वस्तूंना जीआय मानांकन मिळवून घेतलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाने पुढील काळात राज्यातील पावपोळी, माडाच्या हिरापासून तयार केलेली केरसुणी आणि डोस (बेसनाची काप) या तीन वस्तूंना जीआय मानांकन मिळवून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

गोव्यातील काजू फेणी, मंडोळी केळी, हरमलची मिरची, खाजे, मानकुराद आंबा, बेबिंका, आगशीची वांगी, सातशिरा भेंडी, ताळगावची वांगी, हिलारियो आंबा, कोरगुट तांदूळ, काजू बॉडू, मुसराद आंबा आदींसारख्या पंधरा वस्तूंना याआधी जीआय मानांकन मिळालेले आहे.

त्यानंतर राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाने काहीच महिन्यांपूर्वी मीठाचा प्रस्तावही सादर केलेला आहे. त्यानंतर आता पावपोळी, माडाच्या हिरापासून तयार केलेली केरसुणी आणि डोस या तीन वस्तूंची जीआय मानांकनासाठी शिफारस करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मंडळाचे नोडल अधिकारी दीपक परब यांनी दिली.

विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उत्पादित होणाऱ्या आणि विशेष गुणवत्ता किंवा गुणधर्म असलेल्या वस्तूंनाच कायदेशीररीत्या जीआय मानांकन देण्यात येते. अशा वस्तूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते. त्यामुळे त्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळते. जीआय मानांकनामुळे बनावट उत्पादन रोखण्यास मदत मिळते.

दर्जेदार वस्तूंना बाजारात अधिक दर मिळवून देण्यासह शेतकरी किंवा कारागिरांचा आर्थिक स्तर उंचावण्यात जीआय मानांकन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते, दरम्यान, राज्यातील पारंपरिक मिठाला जीआय मानांकन मिळवून घेण्यासाठी जीआय निबंधकांकडे अर्ज सादर केल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाने काहीच दिवसांपूर्वी मीठ उत्पादकांची बैठक घेतली. त्यात मीठ उत्पादक असोसिएशनची स्थापनाही करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT