Flight Pudhari
गोवा

Goa Foreign Tourism | आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी गोवा सज्ज! परदेशी विमानांचे आगमन अन् तिकीट बुकिंगला उधाण

Goa Foreign Tourism | हिवाळ्यात सागरी पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर; आध्यात्मिक, कृषी पर्यटनाकडे वळविण्याचा मानस

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सातासमुद्रापलीकडील वेगवेगळ्या देशांतून पर्यटकांना घेऊन गोव्यात येणाऱ्या विमानांसाठी गोवा सज्ज झाले आहे. सरकार समुद्र किनाऱ्यांबरोबरच पर्यटकांना आध्यात्मिक व कृषी पर्यटनाकडे वळवू पाहत आहे. त्यासाठी सरकारने 'बियॉंड द बीच' संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.

असे असले, तरी अनेक पर्यटकांची गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांनाच अधिक पसंती असते. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या दाबोळी व मोपा या दोन्ही विमानतळांवरून पर्यटन स्थळांवर जाण्याचा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी अनेक टूर ऑपरेटर्सशी संपर्क बनवला जात आहे. अनेकांनी तर मार्च महिन्यापर्यंतची पर्यटकांची विमानप्रवासाची तिकिटेही आरक्षित केली आहेत.

राज्याचा पर्यटन विभाग हिवाळ्यात सागरी पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर देत असून, जगातील अनेक देशांसह मध्य आशियातील पर्यटन बाजारपेठेत राज्याचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात आता परदेशातून पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर विमाने दाखल होत आहेत.

येकातेरिनबर्ग-गोवा हे पहिले चार्टर विमान ३० सप्टेंबरला १६२ पर्यटकांना घेऊन दाखल झाले, तर दुसरे चार्टर विमान रविवारी २८५ पर्यटकांना घेऊन दाबोळीत उतरले. येत्या काही दिवसांत आणखी काही विमाने गोव्याच्या भूमीवर उतरणार आहेत. स्कॅट एअरलाइन्स चार्टर सेवा २३ ऑक्टोबरपासून अल्माटी-दाबोळी हवाई मार्गावर सुरू होणार आहे.

ही सेवा सुरुवातीला २५ डिसेंबरपर्यंत दर शुक्रवारी आठवड्यातून एकदा चालेल. त्यानंतर २९ डिसेंबर २०२६ ते २ एप्रिल २०२७ या कालावधीत मंगळवार आणि शुक्रवार अशी आठवड्यातून दोन दिवस सुरू राहणार आहे. याशिवाय एअर अस्तानाकडून ३० डिसेंबरपासून अस्ताना-गोवा सेवा सुरू होणार आहे. ही विमाने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होणार असून, ३१ मार्च २०२७ पर्यंत दर बुधवारी आठवड्यातून एकदा ही सेवा असणार आहे.

अल्माटी आणि अस्ताना या दोन्ही सेवांमुळे कझाकिस्तानमधील प्रवाशांना दाबोळी आणि मोपा या दोन्ही विमानतळांवरून प्रवासाची सुविधा मिळणार आहे. स्कॅंडिनेव्हिया, पश्चिम आणि पूर्व युरोपातील विविध देशांमधून गोव्याला नियोजित विमानसेवेद्वारे पर्यटक येणार आहेत. यामध्ये आर्मेनिया आणि बेलारूससह मध्यपूर्वेतील बाजारपेठांचाही समावेश आहे. दरम्यान, कझाकिस्तानमधून गोव्याला लवकरच अतिरिक्त हवाई संपर्क मिळणार आहे.

त्यामुळे मध्य आशियातील पर्यटन बाजारपेठेत राज्याचे स्थान बळकट होण्यास मदत मिळणार आहे. प्रत्येक नवीन विमानसेवा स्थानिक व्यवसाय आणि समुदायासाठी संधी घेऊन येते.
चार्टर विमानांनी येणाऱ्या प्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने चार्टर प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीतून टूर ऑपरेटर कंपन्यांना चार्टर विमानांद्वारे पर्यटक पाठवल्याबद्दल सरकार इन्सेंटिव्ह देण्याची शक्यता असून, या प्रयत्नातून पर्यटन क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे.

अनेक ठिकाणांहून तिकिटे आरक्षित:

कॉनकॉर्ड, टीयूआय आणि टीसीआर सारख्या प्रमुख टूर ऑपरेटर्सनी स्कॅंडिनेव्हिया, पश्चिम आणि पूर्व युरोप (आर्मेनिया आणि बेलारूससह) तसेच मध्य पूर्वेतील उदयोन्मुख बाजारपेठामधील देशांमधून गोव्यासाठीच्या नियोजित विमानांमध्ये प्रवाशांची तिकिटे आरक्षित केली आहेत.

यूके, पोलंडमधील चार्टर नोव्हेंबरमध्ये येणार:

यूकेमधील मँचेस्टर आणि लंडन गॅटविक येथून चार्टर विमानेदेखील नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. पहिले यूके चार्टर विमान ४ नोव्हेंबर रोजी मँचेस्टरहून २८५ पर्यटकांना घेऊन येणार आहे, तर ९ नोव्हेंबर रोजी एक पोलिश चार्टर विमान येण्याची शक्यता आहे, असे मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT