गोवा

गोवा : शेवाळ, पारंब्यांनी साकारला गणपती

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे अवाहन नेहमी केले जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती, थर्मोकोलचे मखर आणि कृत्रिम रंगाच्या वापराशिवाय शहरातील बहुतांश कुटुबांना गणेश चतुर्थीची कल्पनाच करवत नाही, पण सांगे मतदारसंघातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या तुडव या आदिवासी बांधवांच्या गावाने या संकल्पनेला तडा देऊन सलग पंचवीस वर्षे जंगलात मिळणाऱ्या नैसर्गिक वस्तू वापरून चतुर्थी साजरी करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. झाडावर उगावणारे शेवाळ आणि वृक्षांच्या पारंब्या वापरून यंदा तुडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या गणेशाची आकर्षक प्रतिकृती तयार केली आहे.

यंदा तुडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पंचविसावा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने या वेळी गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या देखाव्यासाठी बाहेरून केवळ गणपतीची मूर्तीच खरेदी करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व साहित्य जंगलातून काढण्यात आले आहे. त्यासाठी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही. तुडव हा गाव सांगे मतदारसंघाच्या डोंगरमाथ्यावर वसलेला आहे. गावात एकूण तीसच घरे आहेत. युवकांची संख्या जेतमत तीस एवढी असेल. गावातील लोक शेती आणि काजू बागायतीवर स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. सर्व घरे आदिवासी बांधवांची आहेत.

यंदा गोवर्धन पर्वताचा देखावा करण्यासाठी झाडावर उगवणाऱ्या शेवाळाचा वापर करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण प्रकाराचे हे शेवाळ भरपूर दिवस टिकून रहाते. अधूनमधून त्यावर पाणी शिंपडावे लागते. झाडाच्या पारंब्या वापरण्यात आल्याने देखावा आणखी आकर्षक दिसत आहे. नैसर्गिक पद्धतीने देखावे निर्माण करण्याबाबत तुडवाच्या मंडळाला ओळख प्राप्त झाली आहे. पर्यटन खात्याची कित्येक पारितोषिके आम्हाला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती माजी पंच सतीश गावकर यांनी दिली.

पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झाला होता गणेशोत्सव

माजी पंच असलेले सतीश गावकर यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले, पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा तुडव गावात सर्वांत प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला; त्या वेळी गावात कोणत्याही साधनसुविधा उपलब्ध नव्हत्या. गावात पाणी तेवढे नैसर्गिक होते. पण वीज आणि रस्ते नव्हते. हा भाग पूर्णपणे डोंगरमाथ्यावर येतो. गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. तरीही एका शेडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली. आम्ही कधीच थर्मोकोलसारख्या कृत्रिम वस्तूंचा वापर सजावटीसाठी केला नाही. दरवेळी जंगलात मिळणाऱ्या वस्तूंचा वापर करून आम्ही चतुर्थीची सजावट करतो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT