GOA : ‘गोवा फॉरवर्ड’ मडगावात उतरणार 
गोवा

GOA : ‘गोवा फॉरवर्ड’ मडगावात उतरणार

आ. विजय सरदेसाई : पालिका निवडणूक लढणार

पुढारी वृत्तसेवा

मडगाव :विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पालिका निवडणुकीकडे पाहिले जाते. यावर्षी गोवा फॉरवर्ड पक्ष पालिका निवडणुकीच्या माध्यमातून मडगावात प्रवेश करणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सातत्याने मडगावात निवडून येणार्‍या आमदार दिगंबर कामत यांना आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षासोबत कडवी टक्कर द्यावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी असताना आमदार विजय सरदेसाई यांनी फातोर्डा मतदारसंघात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलेले शक्तिप्रदर्शन मडगावकरासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. सरदेसाई यांचे अभिनंदन करण्यासाठी माजीमंत्री दयानंद मांद्रेकर, किरण कांदोळकर असे बहुजन बहुजन समाजाचे नेतेही उपस्थित होते. यावेळी सरदेसाई म्हणाले, आता मडगाव पालिका ताब्यात घेण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्री असताना आम्ही फातोर्ड्यात अकराच्या अकराही जागा जिंकून दाखवल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या पालिका निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पूर्ण क्षमतेने उतरणाल असून मडगाव पालिकेवर गोवा फॉरवर्डचे मंडळ सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, पूर्वी जे झाले ते झाले. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही. फुटाफुटीचे राजकारण होणार नाही. दोन समाजांमध्ये भांडण लावून स्वतःचा फायदा करून घेणार्‍यापैकी आम्ही नाही. आम्हाला मुस्लिम समाजाचाही नगरसेवक निवडून आणायचा आहे. निवडणुकीनंतर मडगाव नगरपालिकेवर गोवा फॉरवर्डचाच नगराध्यक्ष असेल, असे सांगत त्यांनी आमदार दिगंबर कामत यांना थेट आव्हान दिले आहे.

ते म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे मत विभागणीचा फटका बसल्याने भाजप सत्तेत येऊ शकला, असे सांगतानाच त्यांनी काँग्रेसवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत खासदार वेरिएतो फर्नांडिस काँग्रेसमुळे नाही, तर लोकांमुळे निवडून आले आहेत. काँग्रेसने नकार घंटा वाजवल्याने मला भाजपसोबत जावे लागले. असे असले तरी माझा पक्ष भाजपात विलीन केलेला नाही. आता काँग्रेसला झोपेतून जागे व्हावे लागेल, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT