Goa Politics Online Pudhari
गोवा

Goa Politics | गोव्यात नवा राजकीय भूकंप? 'आप'ची साथ सोडून गोवा फॉरवर्ड पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर!

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीच्या चर्चांना वेग ; आप सोबतच्या आघाडीचे काय?

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड व आम आदमी पक्षाने केलेल्या गोवा फर्स्ट युतीला राज्यभरात झालेला विरोध पाहून गोवा फॉरवर्डने आता काँग्रेस बरोबर चर्चेची तयारी दाखवत 'सेकंड गिअर' टाकला आहे. काँग्रेसने त्यांची दारे खुली असल्याचे स्पष्ट केल्याने दोन्ही पक्षांमध्ये युती करण्याबरोबरच विलीनीकरणाच्या पर्यायावरही विचार सुरू झाला आहे,

अशी चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात आप व गोवा फॉरवर्डची गोवा फर्स्ट युती कायम राहते की काँग्रेससोबत नव्या समीकरणाला आकार मिळतो, याकडे गोव्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गोवा फॉरवर्ड व आम आदमी पक्षाने युती करून गोवा फर्स्ट आघाडी स्थापन केली असली तरी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) यांच्यातील स्थगित असलेल्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे.

त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांवरूनही तसे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांतील उच्चपदस्थ सूत्रांनी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, या चर्चांबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये विचारमंथन सुरू आहे. पूर्वी स्थगित ठेवलेल्या युतीच्या निर्णयावर आता पुन्हा एकदा पश्चात चर्चा केली जाणार आहे. काँग्रेससोबत पुढील अधिकृत बोलणी करायची किंवा नाही, याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व अत्यंत वेगाने घेईल, असे मत पक्षाचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी व्यक्त केले.

राजकीय प्रवासात कधी एखादे पाऊल चुकले असल्यास ते मागे घेणे यातच मनाचा मोठेपणा असतो, अशी टिप्पणी करत त्यांनी उंदराला शोधण्यासाठी संपूर्ण घरालाच आग लावणे योग्य नाही, असे विधान करून राजकीय परिपक्वता दाखवली आहे.

गोवावासीयांना भाजपला सक्षम पर्याय शोधत आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास भाजपचा पराभव करणे शक्य आहे, असा दावा नाईक यांनी केला आहे. नाईक म्हणाले की, भाजप सरकारला सत्तेवरून हटवून जनतेला त्रासातून मुक्त करणे हाच मुख्य राजकीय हेतू आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पक्ष सर्व आवश्यक पावले उचलण्यास तयार आहे.
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी युतीसाठी पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले आहे. या सकारात्मक संकेतांचा विचार करता, योग्य राजकीय वळणावर जुन्या चुका दुरुस्त करून पुढे जाणे योग्य ठरेल.

गोव्याच्या राजकीय हितासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात एकसंध लढा द्यावा, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे प्रशांत नाईक यांनी आवर्जून नमूद केले. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.

विविध पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या राजकीय वातावरणात गोवा फॉरवर्ड पक्षाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. 'गोवा फर्स्ट' हे पक्षाचे मूळ धोरण कायम ठेवत राज्यातील जनतेला एकजूट, विश्वासार्ह आणि धर्मनिरपेक्ष पर्याय देण्यासाठी सर्व समविचारी शक्तींना एकत्र आणण्यास पक्ष पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे गोवा फॉरवर्डने समाजमाध्यमांद्वारे स्पष्ट केले आहे.

काहीतरी सकारात्मक घडेल : नाईक

गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी सोशल मीडियावर आप व गोवा फॉरवर्ड युतीवर टीका करणाऱ्या एका पोस्टला उत्तर देताना, 'तुमची चिंता योग्य ठिकाणी पोहोचली आहे. लवकरच काहीतरी सकारात्मक घडेल,' असे सूचक वक्तव्य केले आहे.

गोवा फॉरवर्डने मात्र आपली भूमिका स्पष्ट करताना 'गोवा फर्स्ट' आणि गोव्यासाठी एकत्रित धर्मनिरपेक्ष पर्याय उभा करण्याची बांधिलकी कायम असल्याचे म्हटले आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत केवळ चर्चांवर आधारित अंदाज टाळण्याचे आवाहनही पक्षाने केले आहे. युतीनंतरही गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विरोधकांच्या एकीबाबत जनभावनेनुसार पुनर्रचनेची शक्यता खुली ठेवली असल्याचे उघड केले होते.

आता अमित पाटकर यांचे काय?

गोवा फॉरवर्डने जर काँग्रेस आघाडीचा मार्ग निवडला तर तिसऱ्या आघाडीत जाण्याच्या तयारीत असलेले अमित पाटकर यांच्या समोर राजकीय संकट येणार आहे. काँग्रेसमधील सध्याच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद उघड झाले आहेत.

त्यांच्याशी आता पाटकर यांचे राजकीय सूर जुळणे कठीण मानले जाते. तिसऱ्या आघाडीचा मनसुबा पक्का करूनच त्यांची वाटचाल सुरू झाली होती. परंतु बदलत्या राजकीय समीकरणात काँग्रेस-गोवा फॉरवर्ड एकत्र आले तर अमित पाटकर काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT