पणजी : पुढारी वृत्तसेवा
राजकारणात कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू कोणी नसतात, हे वाक्य काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील नव्याने होणाऱ्या युतीच्या चर्चेला समर्पक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी तुटलेली या दोन पक्षांची युती पुन्हा जुळणार आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची युतीची बोलणी पितृपक्षानंतर होणार आहेत. या युतीत आरजी पक्ष या अगोदरच सामील झालेला आहे.
२०२७ च्या विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय समीकरणे बदलत आहेत. काही दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डने काँग्रेस सोबतची बोलणी स्थगित करून आम आदमी पक्षासोबत 'गोवा फर्स्ट' युती केली होती. त्यानंतर राज्यभर काँग्रेसचे आमदार पुन्हा तिसऱ्यांदा फुटणार, त्यामुळे गोवेकरांनी भाजप व काँग्रेसपासून दूर राहावे, असे आवाहनही केले होते; मात्र शेवटी सरदेसाई यांना सत्य स्थिती कळाली.
हे राजकीय सत्य सरदेसाई यांच्या उशिरा ध्यानात आले आणि त्यांनी 'आप'सोबतच्या युतीचे राज्यभरातील होर्डिंग्स काढायला लावत 'गोवा फर्स्ट' युती मोडीत काढली. राजकीय निर्णय नवरात्रीतच सुरू होतील, असे सांगितले जात आहे. राजकीय युती ही मैत्रीच्या गणितापेक्षा राजकीय मत जुळवाजुळवीवर अधिक अवलंबून आहे. काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षांपैकी एक आहे.
फॉरवर्डला हे माहीत आहे की एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवणे, विशेषतः ज्या मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षांची मते आधीच विखुरलेली आहेत, तर भाजपला मदत होऊ शकते, असे एका राजकीय निरीक्षकाने सांगितले.
फॉरवर्ड विलीन होणार की युती करणार...
गोवा फॉरवर्ड व काँग्रेस यांच्या युतीची बोलणी सुरू होतील. त्यावेळी या चर्चेदरम्यान, गोवा फॉरवर्डने काँग्रेस पक्षात विलीन व्हावे की युती करावी यावर सध्या व्यापक चर्चा सुरू आहे. फॉरवर्डच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा करण्यास पसंती दर्शवली आहे. विलीनीकरण झाले आणि निवडणुकीत काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळाली तर सरदेसाई राजकारणात ज्येष्ठ असल्याने ते मुख्यमंत्रीपदाचे दमदार दावेदार ठरू शकतात.
विलीनीकरणाला विरोध:
काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, सरदेसाईंच्या काँग्रेसमध्ये सामील होण्याला काही पक्ष सदस्यांचा विरोध आहे. कारण पक्षाला जादुई बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री होण्याची संधी ज्येष्ठ आमदार म्हणून सरदेसाई यांना मिळून मूळ काँग्रेसच्या दावेदारांना त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल. त्यामुळे विलीकरणाला काहीजण विरोध करत असल्याचे पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.