Dinya Jatra Canacona 
गोवा

Goa news | काणकोणात गुढीपाडव्याला भरते 'दिन्या जत्रा'

ही जत्रा आदिवासींच्या निसर्गकेंद्री जीवनशैलीचे जिवंत प्रतीक आहे

पुढारी वृत्तसेवा

आदिवासी समाजात शिमगोत्सवानंतर येणाऱ्या अमावस्येपासून नववर्षाची सुरुवात होते. अमावस्येनंतरचा दुसरा दिवस, म्हणजेच पाडव्याचा दिवस, आदिवासी समाज 'संसारपाडवो' म्हणून साजरा करतो. या दिवसापासूनच पूर्वी आदिवासी समुदाय कुमेरी (झूम/शिफ्टिंग) लागवडीच्या कार्याला प्रारंभ करत असे. त्यामुळे हा दिवस केवळ सण नसून त्यांच्या उपजीविकेच्या आणि निसर्गाशी असलेल्या नात्याच्या नव्या चक्राची सुरुवात दर्शवतो.

याउलट, व्यापक हिंदू समाजात गुढीपाडवा हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. अशा प्रकारे 'संसारपाडवो' आणि गुढीपाडवा हे दोन्ही सण नववर्षाचे प्रतीक असले, तरी त्यांच्या आशयात आणि मूलभूत तत्त्वज्ञानात फरक दिसून येतो. 'संसारपाडवो' हा निसर्गाशी थेट जोडलेला, श्रमप्रधान आणि पर्यावरणकेंद्री जीवनपद्धतीचे प्रतिनिधित्व करणारा उत्सव आहे. गुळे, आसाळी, वैजावाडी, नुवे, इंद्रावाडा, नाणे, सातोर्ली अशा गावांमध्ये 'संसारपाडवो' निमित्त 'दिन्या जत्रा' साजरी केली जाते. ही जत्रा आदिवासींच्या निसर्गकेंद्री जीवनशैलीचे जिवंत प्रतीक आहे.

या जत्रेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची पूर्णपणे पर्यावरणपूरक रचना. 'जिना' किंवा 'दिन्या झाड' यापासून आणलेले खांब, कोसमाची पाने, उपरीची फुले, माडाच्या झावळ्या आणि विविध रंगांची जंगलातील पाने यांचा वापर करून गुढी तयार केली जाते. विशेष म्हणजे प्लास्टिक, रासायनिक रंग किंवा कृत्रिम सजावटींचा वापर पूर्णतः टाळला जातो. आदिवासी समाज जंगलातील साधनसंपत्तीचा वापर करताना मर्यादा आणि जबाबदारीचे भान जपतो. आवश्यक तेवढ्याच प्रमाणात संसाधनांचा वापर करून जैवविविधतेचे संरक्षण केले जाते. 'निसर्गाकडून घेणे, पण त्याचे जतन करणे' हा मूलभूत पर्यावरणीय सिद्धांत या परंपरेत स्पष्टपणे दिसून येतो.

'शिपा रात्री' हा विधी काणकोण तालुक्यातील प्रसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थानात शिमगोत्सवावेळी केला जातो; तसेच हाच विधी दिन्या जत्रेच्या दिवशीही पार पाडला जातो. हा विधी पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैलीचे प्रतीक आहे. चुलीवर 'चोरू' शिजवण्याची पद्धत ही नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित असून, प्रदूषण नियंत्रणाचा विचार त्यात अंतर्भूत आहे. 'कट्ट्यां दिवसा' या परंपरेत नारळाच्या करवंटी, शेण आणि शिंपले यांसारख्या जैवविघटनशील वस्तूंचा वापर करून दिवे तयार केले जातात. यामधून पुनर्वापर आणि पर्यावरणपूरकता यांचे महत्त्व अधोरेखित होते. सातोर्ली गावात केळीच्या सालीपासून मंदिर उभारण्याची परंपरा ही निसर्गाशी असलेल्या सर्जनशील आणि संवेदनशील नात्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

या सर्वांमधून 'संसारपाडवो' हा उत्सव पर्यावरणीय शाश्वतता, सामुहिकता आणि निसर्गाशी सुसंवाद यांचे जिवंत उदाहरण ठरतो. मात्र, बदलत्या काळात आदिवासी समाजातील काही युवक पारंपरिक सण-उत्सवांकडे दुर्लक्ष करून इतर पद्धतींचा स्वीकार करताना दिसतात. काणकोण तालुक्यातील काही भागांत 'संसारपाडवो'च्या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन वाढत आहे, ज्यामुळे परंपरेत द्विधा मनस्थिती निर्माण होत आहे. ही बाब आदिवासी संस्कृतीच्या दृष्टीने चिंताजनक ठरू शकते, कारण अशा बदलांमुळे आदिवासी समुदायाची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आणि परंपरा हळूहळू लुप्त होण्याची भीती निर्माण होते. या सणांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

- देविदास गावकर, काणकोण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT