पणजी : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षीप्रमाणे मच्छीमार खात्याने जून महिन्यात मासेमारी बंदी लागू केली आहे. मात्र, यंदा पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पावसाअभावी मासळीच्या प्रजननाचा कालावधी पुढे गेल्याचा दावा मच्छीमार करीत असून, मासेमारी बंदीचा कालावधी पुनर्विचार करून उठवावा, अशी मागणी काही होत आहे.
सध्या बाजारात कोल्ड स्टोरेजमधील मासळी तसेच सुक्या मासळीवरच ग्राहकांची भिस्त आहे. या मासळीचे दर तुलनेने जास्त असल्याने, त्यापेक्षा सुकी मासळी, अंडी किंवा चिकन खाणे परवडत असल्याचे काही ग्राहकांचे म्हणणे आहे. बाजारात उपलब्ध होणारी मासळी अल्पावधीतच विकली जाते आणि त्यामुळे मासळी बाजारही लवकर आटोपतो, असे मत व्यक्त केले जात आहे.
त्यामुळे मच्छीमारांनी मच्छीमार खात्याकडे मासेमारी बंदीचा कालावधी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. किमान पावसाळ्याची प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतरच बंदी लागू करावी, प्रजनन जेणेकरून मासळीच्या प्रक्रियेला योग्य कालावधी मिळेल आणि मच्छीमारांनाही तूर्त आर्थिक दिलासा मिळेल, अशी त्यांची भूमिका आहे.
मासळीची आवक घटली
पणजी मासळी बाजारात ताज्या मासळीची आवक कमी झाली होती. मासेमारी बंदीमुळे बाजारात कोल्ड स्टोरेजमधील मासे विक्रीसाठी आणले होते. बांगडे ३०० रु. किलो होते. वेर्ले, प्रॉन्स, काळुंद्रा, शेंगट आदी मासे विक्रीसाठी होते. बहुतेक मोठे मासे सकाळीच खरेदी करण्यात आले होते. पापलेट, सुरमई (इसवण) यांची आवक फारशी नव्हती.
'रॉकेट मासेमारी' ला सुरुवात
दरम्यान, काही मच्छीमारांनी 'रॉकेट मासेमारी' ला सुरुवात केली असून, या पद्धतीने मिळणारी मासळी चविष्ट असली तरी तिचे दर अधिक आहेत. तथापि, खवय्ये या मासळीचा शोध घेत असतात. सध्या या मासळीची मागणी वाढली असली, तरी पाण्याचा जोर अधिक असल्याने मासेमारी करताना अडचणी निर्माण होत आहेत, असे काही मच्छीमारांचे म्हणणे आहे.