Dengue : शहरात १० महिन्यांत आढळले ६३४ डेंग्यूसदृश रुग्ण pudhari photo
गोवा

Goa News | गोव्यात मासेमारी जेटी अन् बोटींवर डेंग्यूचा धोका; मत्स्योद्योग खात्याकडून कडक सूचना जारी!

Goa News | मत्स्योद्योगकडून सूचना जारी : कामगारांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पावसाची सद्यस्थिती आणि डेंग्यूसह इतर कीटकजन्य आजारांचा होणारा फैलाव विचारात घेऊन मत्स्योद्योग खात्याने मासेमारी जेटी आणि मासेमारी होड्यांवर कीटकजन्य आजारांना प्रतिबंध व नियंत्रणासाठी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

खात्याने जारी केलेल्या नोटीसनुसार, मासेमारी बोटी आणि कॅनव्हसवर कुठेही पाणी साचणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी गरज असेल, तिथे तारपोलिनने बोटीवर आच्छादन घालावे, असेही सूचित करण्यात आले आहे. वापरात नसलेल्या छोट्या बोटी, होड्या आणि डिंगी उलट्या ठेवून त्यावर योग्य आच्छादन घालावे.

बोटीवरील फेंडर्स म्हणून वापरल्या जाणाऱ्या टायर्समध्ये पाणी साचणार नाही, यासाठी त्यांना पाणी वाहून जाण्यासाठी छिद्रे करावीत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच जहाजांची नियमित तपासणी करून त्यावर कुठेही पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जेटी आणि परिसरात तसेच पाण्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या, जुने टायर्स, भंगार साहित्य, नारळाच्या करंवट्या, क्रेट्स किंवा अन्य प्रकारचा कचरा टाकू नये. अशा वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असल्याने जेटी परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डेंग्यू आणि इतर कीटकजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य खात्याने दिलेल्या सूचना व सल्ल्याचे पालन करावे. त्याचबरोबर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मासेमारी जहाजावर एक मुख्य मार्गदर्शक अधिकारी नियुक्त करावा, असा आदेशही खात्याने दिला आहे.

जुलैमध्ये आढळले ८८२ संशयित रुग्ण

राज्यात जुलै महिन्यात डेंग्यूचे ८८२ संशयित रुग्ण आढळले होते. मात्र अंतिम चाचणीनंतर यातील केवळ सात जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व सात रुग्ण दक्षिण गोव्यातील होते. यात फोंडा येथील तीन, तर मडगाव, कुडतरी, सांगे आणि लोटली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कुटबण जेटीवरही डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी...

  • घराच्या छतावर, कुंड्यांमध्ये, जुन्या टायर्समध्ये अथवा कुलरमध्ये पाणी साचू देऊ नये.

  • पिण्याचे व वापराचे पाणी नेहमी झाकून ठेवावे. साठवलेले पाणी नियमितपणे बदलावे.

  • डासांपासून बचावासाठी पूर्ण बाहींचे कपडे घालावेत. डास प्रतिबंधक क्रीम किंवा मच्छदाणीचा वापर करावा.

  • ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी किंवा अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT