FDA India News Pudhari
गोवा

Goa FDA Raid |'एफडीए'ची तिसवाडी तालुक्यात धडक कारवाई! अस्वच्छतेमुळे 9 खाद्य आस्थापनांना टाळे

Goa FDA Raid | नऊ दुकाने बंदीचे आदेश; ७० किलो मावा केला नष्ट

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने शनिवारी तिसवाडी तालुक्यात व्यापक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, किरकोळ विक्रेते, रेस्टॉरंट, कँटीन, ज्यूस सेंटर तसेच खाद्यपदार्थ उत्पादन युनिट्स अशा विविध खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली.

गोवा मेडिकल कॉलेजच्या बाहेरील परिसरातील एकूण ३९ खाद्य व्यवसाय आणि त्यांच्या स्वयंपाकघरांची तपासणी करण्यात आली. यापैकी अस्वच्छ परिस्थिती तसेच वैध एफएसएसएआय नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना नसल्याचे आढळून आल्याने ९ खाद्य व्यवसायांना तात्काळ कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.


दरम्यान, 'अनमोल स्वीट्स' या मिठाई उत्पादकाकडे तपासणीदरम्यान १९ हजार ६०० रुपये किमतीचा ७० किलो मुदतबाह्य मावा आढळून आला. हा मावा नष्ट करण्यात आला असून, आवश्यक सुधारणा होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खाद्य व्यवसायांमध्ये स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि आवश्यक परवान्यांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी अशी मोहीम यापुढेही विविध भागांत सुरू राहणार असल्याचे एफडीकडून सांगण्यात आले. सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी विहित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांचे परवाने निलंबित करण्यात येतील, असा इशाराही एफडीएने दिला आहे.
या तपासणी पथकात संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, योगिता सिरसात, अमित मांद्रेकर, डार्लेन दिउकर, लेनिन डिसा आणि सफिया खान (अन्न सुरक्षा अधिकारी) यांच्यासह कर्मचारी संदीप शेळके आणि साईनाथ चारी यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT