Water Scarcity Pudhari
गोवा

Goa Water Scarcity Crisis | थेंब थेंब पाणी जपूया, निसर्गाचा ठेवा वाचवूया...

Goa Water Scarcity Crisis | पाणी बचतीच्या सवयींनीच टळणार उद्याची टंचाई; जबाबदार भूमिका घेणे अत्यंत आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : काव्या कोळस्कर

गोवा हा नद्या, झरे आणि मुबलक पर्जन्यवृष्टीसाठी ओळखला जात असला तरी इथले पाणीस्रोत अमर्यादित नाहीत. वाढते शहरीकरण, पर्यटन व्यवसायाचा विस्तार, भूजल पातळीत होणारी घट आणि हवामान बदल यांमुळे भविष्यात राज्यास पाणीटंचाईच्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागू, शकते. हे चित्र बदलायचे असेल, तर आजपासूनच प्रत्येकाने पाण्याच्या वापराबाबत जबाबदार भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे.

माहितीनुसार, घरातील दैनंदिन सवयींमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. हात धुताना नळ सतत उघडा ठेवणे, दाढी करताना नळ सुरू ठेवणे, अंघोळीदरम्यान शॉवर चालू ठेवणे, गाडी किंवा अंगण स्वच्छ करण्यासाठी पाईपचा वापर करणे अशा सवर्दीमुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जाते. यावर उपाय म्हणून आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याची सवय स्वतःला आणि लहान मुलांनाही लावल्यास दिवसाकाठी हजारो लिटर पाणी वाचू शकते.

देशातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होणाऱ्या राज्यांपैकी एक असलेल्या गोव्यातही पाण्याच्या उपलब्धतेबाबत पुजारी चिंता व्यक्त होत आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. गावागावांत अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

राज्याला निसर्गाने नद्या, झरे तलाव आणि भरपूर पावसाचे वरदान दिले आहे. मांडवी, झुआरी, तेरेखोल, शापोरा यांसारख्या नद्या राज्याची जीवनवाहिनी मानल्या जातात. मात्र वाढते शहरीकरण, पर्यटन उद्योगाचा विस्तार, भूजलाचा वाढता उपसा आणि जलस्रोतांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे भविष्यातील पाणीसुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. घरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची अंमलबजावणी, गळती रोखणे, जलस्रोतांची स्वच्छता राखणे आणि भूजलसाठा वाढविण्याच्या उपाययोजना संपूर्ण दिस राबवणे ही काळाची गरज आहे. गोवा पाण्याने समृद्ध असला तरी संसाधनांचा विचारपूर्वक वापर न केल्यास भविष्यात गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

अपुऱ्या उपाययोजना

तज्ज्ञांच्या मते, गोव्यात पडणाऱ्या पावसाचे मोठे प्रमाण थेट समुद्रात वाहून जाते. पावसाचे पाणी साठविणे आणि जमिनीत मुरविण्याच्या उपाययोजना अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने भूजलसाठ्यांवर परिणाम होत आहे. परिणामी, अनेक विहिरी व हारे उन्हाळ्यात आटत असल्याचे चित्र दिसून येते.

वाढते पर्यटन आणि पाण्याची समस्या !

पर्यटन क्षेत्रामुळे राज्यातील पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, स्विमिंग पूल आणि इतर सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत असल्याने उपलब्ध जलस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील पारंपरिक जलस्रोतांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT