पणजी : गोवा अबकारी खात्यातील कथित ‘कॅश फॉर जॉब्स’ घोटाळ्याप्रकरणातील फरारी असलेला मुख्य संशयित अजित शंखवाळकर याने पणजी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळणे आणि बनावट सरकारी नियुक्तीपत्रे तयार केल्याचा गुन्हा पणजी पोलिसांनी दाखल केला आहे.
संशयित अजित शंखवाळकर याच्याविरुद्ध पणजी पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी करूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्या पत्नीलाही या गुन्ह्यात सहसंशयित म्हणून नोंद करण्यात आल्याने तिने न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला आहे.
पोलिसांच्या त्याच्या ताळगाव येथील घरी झडती घेऊन काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केली होती. सुमारे दीड महिना तो पोलिसांची अटक चुकवण्यात यशस्वी ठरला होता. पत्नीच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी तिला अटक होण्याची शक्यता असल्याने अखेर त्याने न्यायालयात आत्मसमर्पण केले.
बोगस नियुक्तपत्र देऊन अबकारी खात्यात नोकरी मिळवून देण्याचा प्रकार गेल्या ऑक्टोबर महिन्यात मनोज तळेकर या व्यक्तीने अबकारी आयुक्तपदाचा ताबा घेण्यास आला असता उघडकीस आला.
यासंदर्भात खात्याचे सहाय्यक आयुक्त संकेत साखरदांडे यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याच्या प्राथमिक चौकशीत तळेकर यांच्याकडून संशयित अजित शंखवाळकर याने २७ लाख रुपये नोकरी मिळवून देण्यासाठी घेतले होते.
याव्यतिरिक्त मळेकर याच्या बहिणीला लेखा विभागात नोकरी देण्यासाठी २५ लाख तर पर्वरी येथे कोमुनिदाद जमिनीत भूखंड देण्यासाठी ८० लाख रुपये मळेकर कुटुंबियांकडून त्याने घेतले होते. सुमारे १ कोटी ३२ लाख रुपये मळेकर या कुटुंबियांकडून नोकरी व भूखंड देण्याचे आश्वासन देऊन लुबाडले होते. या प्रकरणात सरकारी नियुक्ती झाल्याचे भासवण्यासाठी बनावट सरकारी नियुक्तीपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप संशयित शंखवाळकर याच्यावर आहे.
अबकारी विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत संबंधितांकडून पैसे घेतल्याचे प्रकरण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शंखवाळकरच्या शरणागतीनंतर या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बनावट नियुक्तीपत्रांची निर्मिती व वापर तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
संशयिताचे राजकारण्यांशी संबंध
संशयित अजित शंखवाळकर याचे एकेकाळी राजकारण्यांशी संबंध होते त्याचा फायदा उठवून तो पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देत असे. त्यामुळे त्याचे पोलिस अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध होते. त्याने यापूर्वी नोकरी देण्यासाठी तसेच बदल्या करण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे.