पणजी : पश्चिम घाटाच्या जैववैविध्याने नटलेल्या चोर्ला घाटात एक दुर्मीळ स्कर्ट मशरूम ( फॉलस इंडस्टास ) आढळून आला आहे. सुर्ला गावचे निसर्गप्रेमी नामदेव गावकर यांनी या अद्भुत प्रजातीचे छायाचित्र घेतले असून, या शोधामुळे परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
ही मशरूम प्रजाती अत्यंत दुर्मीळ असून ‘व्हील्ड लेडी’ या नावानेही ओळखली जाते. हिला खास ओळख देणारा भाग म्हणजे तिच्या देहाभोवती असलेली जाळीदार, स्कर्टसारखी संरचना. सामान्यतः ती दमट, गडद जंगलात वाढते व अपघटन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. आशिया आणि दक्षिण अमेरिका खंडात याचा काही प्रमाणात औषधी व अन्न म्हणूनही उपयोग केला जातो. गावकर यांनी ही मशरूम चोर्ला घाटाच्या घनदाट जंगलात शोधून काढली. आमच्या भागात विविध दुर्मीळ प्रजाती आढळतात, पण स्कर्ट मशरूम प्रथमच पाहिली. हे खूपच नयनरम्य आणि आश्चर्यजनक दृश्य होते असे गावकर म्हणाले.
चोर्ला घाट हा गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमांवर वसलेला भाग आहे. तो ‘वेस्टर्न घाट्स’ म्हणजेच सह्याद्रीच्या जैवविविधतेने परिपूर्ण पट्ट्यात येतो. विविध पक्षी, प्राणी, सर्प, वनस्पती आणि दुर्मीळ मशरूम प्रजाती इथं आढळतात. या घटनेनंतर जैवविविधता अभ्यासक व पर्यावरण प्रेमींनी चोर्ला घाटातील परिसंस्थेचे संवर्धन करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.