पणजी : देशभरासह राज्यात शनिवारी (दि. 21 रोजी) योग दिनानिमित्त हजारो कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे राज्य योगासने आणि योग करण्यात गुंग असताना मंत्रिपदाचा ‘योग’ कोणाच्या नशिबी या चर्चेलाही वेग आला आहे. त्यासाठी पडद्यामागे लॉबिंग, भेटीगाठी सुरू आहेत. सध्या मंत्रिमंडळात माजी मंत्री गोविंद गावडे यांची जागा रिक्त आहे. याशिवाय अन्य काही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन मंत्रिमंडळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी काहींनी बाशिंग बांधले आहे. मात्र, विद्यमान मंत्रिमंडळातील काही चर्चेतील मंत्र्यांनी आपले मंत्रिपद कायम राहणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
मार्च 2022 मध्ये सत्तेत आलेल्या भाजपकडे बहुमत असल्याने त्यांनी विजयी आमदारांपैकी बारा जणांचे मंत्रिमंडळ बनवले. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट भाजपमध्ये सहभागी झाला. त्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार, या चर्चांना सुरुवात झाली. ही चर्चा आजही कायम आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी नव्यांना संधी देण्यात येणार, असेही बोलले जात आहे. मात्र, त्याला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. विविध कारणांनी केंद्रीय नेते व्यस्त राहतात, शिवाय राज्यातील नेत्यांकडून मंत्रिमंडळातील फेरबदलाची फारशी इच्छाशक्ती दिसत नव्हती.
यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने त्यांच्या जागी कोण? या चर्चेला वेग आला आहे. त्यासोबतच अन्य काही मंत्र्यांना वगळण्यात यावे, असा अहवाल प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे आहे. सभापती रमेश तवडकर यांनाही सभापतीपदापेक्षा मंत्रिपदात रस आहे. त्यामुळे फेरबदल होणार, हे निश्चित आहे. पण ते कधी हे अद्यापही ठरलेले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही यापूर्वी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या फेरबदलाचीच जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी काही मंत्र्यांना वगळावे लागणार आहे.
शुक्रवारी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आपल्याला वगळण्यात येत असल्याबाबत केवळ वावड्या उठतात, असे म्हटले आहे, तर आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो आणि सभापती तवडकर यांनी पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती पार पाडली जाईल, असे म्हटले आहे. योग दिनी सर्वज जण व्यग्र आहेत. त्यामुळे कदाचित सोमवारी कृती होण्याची शक्यता आहे.
समाज कल्याण हे लोकहिताचे खाते आहे. या खात्यामार्फत आपण लोकसेवेचे काम करत आहे आणि खात्याला न्याय देत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नेहमीच सहकार्य करीत आहेत. त्यामुळे मला मंत्रिमंडळातून वगळण्याचा प्रश्नच येत नाही, असा ठाम विश्वास समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केला.
पक्ष जी जबाबदारी आपल्यावर सोपवेल, ती पेलण्यासाठी आपण सक्षम असून आपली तयारी आहे. मिळालेल्या पदातून जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची संधी दिल्यास नक्कीच स्वीकारणार, असे सभापती रमेश तवडकर म्हणाले.
मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासूनच मला मंत्रिमंडळातून वगळण्यात येईल, याबाबत चर्चा सुरू आहेत. आपण आपल्या खात्याला योग्य प्रकारे न्याय देत असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवण्यामध्ये आमचे खाते पुढे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातून वगळणार या केवळ वावड्या आहेत, अशी प्रतिक्रिया मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद दिले किंवा अन्य कोणतीही जबाबदारी दिली, तर ती स्वीकारण्यास मी तयार आहे. सध्या माझ्याकडे मनोरंजन संस्थेची जबाबदारी असून, तीही मी व्यवस्थित पार पाडत आहे. त्यामुळे यापेक्षा मोठी आणि मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यास ती पार पाडेन, असे आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले.
पक्षशिस्त महत्त्वाची असून पक्षाच्या विरोधात कोणतीही कृती अथवा वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. मंत्रिपद कोणाला द्यावे आणि कुणाला वगळावे हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. पक्षशिस्त कार्यकर्त्यांपासून मोठी पदे सांभाळणार्या जबाबदार व्यक्तींपर्यंत सर्वांना लागू आहे, याचा पुनरुच्चार भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला आहे