पणजी : गोव्याच्या पाच नोंदणीकृत राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याची व पक्षाच्या यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार या पाच पक्षांना निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.
गोव्यातील नोंदणीकृत पक्ष असलेले मात्र गेल्या काही निवडणुका न लढवलेले गोवा सु-राज पार्टी, गोवा विकास पार्टी, निज गोयकर रिव्होल्युशन फ्रंट, सत्तरी युवा मोर्चा आणि युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी या पाच पक्षांनी 2019 पासून कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. निवडणूक प्रणाली स्वच्छ करण्याच्या देशव्यापी प्रयत्नांचा एक भाग म्हणून गोव्यातील वरील पाच नोंदणीकृत पक्षांना राजकीय पक्षांच्या यादीतून वगळण्याच्या निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीचा हा एक भाग म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आयोगाच्या निकषांनुसार, 2019 पासून सलग सहा वर्षे एकही निवडणूक न लढवणारे पक्ष यादीतून वगळण्यास पात्र आहेत. या मोहिमेच्या दुसर्या फेरीत, देशातील 476 राजकीय पक्ष अपात्र ठरले आहेत. यात राज्यातील पाच पक्षांचा समावेश आहे.
गोवाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या पाच पक्षांना सप्टेंबरच्या सुरुवातीला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानंतर त्यावर सुनावणी होणार आहे. जर त्यांनी उत्तर दिले नाही तर पक्षांना नोंदणीमधून वगळले जाईल. त्यांनी पूर्वी दिलेल्या पत्त्यावर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.