पणजी : पुढारी वृत्तसेवा
पाचवी ते नववीच्या मराठी पुस्तकात गोव्यातील लेखकांना पुरेसे स्थान देण्यात आले नसून बाहेरील राज्यांतील लेखकांचा समावेश अधिक असल्याच्या टीकेला उत्तर देताना शेटगावकर म्हणाल्या की, पाठ्यपुस्तकांतील आशय आणि संदर्भहे १०० टक्के गोव्याशी संबंधित आहेत. विद्यार्थ्यांना स्थानिक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वास्तवाशी जोडणारा आशय देण्यावर भर देण्यात आला आहे.
लेखकांबाबत व्यक्त झालेल्या सूचनांचा भविष्यात निश्चितच विचार केला जाईल; मात्र सध्या पुस्तके मागे घेण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या सुरू झालेल्या वादामुळे लवकरच स्वतंत्र पुनरावलोकन समिती स्थापन केली जाईल आणि त्यांच्या सुधारणांवर भर दिला जाईल.
पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अनिल सामंत, विभागाच्या सरिता गाडगीळ, सुशांत नाईक आणि रूपेश सागर उपस्थित होते. जवळपास दोन वर्षांच्या परिश्रमातून ही पुस्तके तयार करण्यात आली असून त्यामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक करणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० नुसार अभ्यासक्रम विकसित करणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
एनईपी २०२०च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी एकूण ४१ पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. या प्रक्रियेत सुमारे १५० शिक्षक, विषयतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी होते.
गोमंतकीय लेखकांनाही प्राधान्य मिळेल
गोव्यातील लेखकांकडून विशेषतः लहान मुलांसाठीचे दर्जेदार साहित्य तुलनेने कमी उपलब्ध होते. मात्र, भविष्यात नववी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये गोव्यातील लेखकांच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा १०० टक्के गोमंतकीय लेखकांचे साहित्य पुस्तकात पाहायला मिळेल, असे समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले.