ईडीचे उत्तर गोव्यात 12 ठिकाणी छापासत्र Pudhari Photo
गोवा

Goa News : ईडीचे उत्तर गोव्यात 12 ठिकाणी छापासत्र

संशयास्पद कागदपत्रे जप्त; पोलिसांच्या मदतीने कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी/हणजूण ः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन हडप प्रकरणातील संशयितासह त्याच्याशी संबंध असलेल्या एका विकासकाचे निवासस्थान व कार्यालयांवर हणजूणसह उत्तर गोव्यातील 12 ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. या कारवाईत गोवा व मुंबईच्या ईडी अधिकार्‍यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करत मोठ्या प्रमाणात संशयास्पद कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ईडीने घातलेल्या या छाप्यामध्ये जमीन हडप प्रकरणाशी संबंधित संशयित व काही व्यावसायिकांसह एका विकासकाचाही (बिल्डर) समावेश आहे. यात हणजूण भूमिका देवस्थानाजवळ राहणारा एक बांधकाम व्यावसायिक, दुसरा त्याचा वाहन चालक, तिसरा हणजूण कायसुव पंचायतीचा पंच सदस्य व चौथा आसगाव येथील गोल्डन मॅन म्हणून ओळखला जाणारा स्थानिक आहे. मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिराही सुरू होती. या छाप्यामुळे जमीन हडप प्रकरणाशी संबंधित असलेल्या इतरांचेही धाबे दणाणले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन हडप प्रकरणाशी संबंधित असलेल्या बार्देशमधील एका राजकीय पक्षाशी जवळीक असलेल्या व्यावसायिकाच्या घरावर व कार्यालयावर एकाचवेळी हा छापा टाकण्यात आला. या कारवाईमुळे हा व्यावसायिक चक्रावरून गेला आहे. त्याला हे अपेक्षित नसल्याने त्याचेही धाबे दणाणले. दोन्हीकडील झाडाझडती सुरू झाल्यावर जमीन हडप प्रकरणाशी संबंधित अनेक दस्तावेज सापडले आहेत. ईडीनेे गेल्या आठवड्यात अशीच धडक कारवाई करत दक्षिणेतील काही जमीन हडप प्रकरणाशी संबंधितांची चौकशी केली होती.

युको बँकेत बनावट दागिने तारण ठेवून सुमारे 2.63 कोटींची फसवणूक केल्याने कोलवाचे हेमंंत रायकर व मुगाळीचे गुंडू कोलवेकर यांच्या निवासस्थानीही छापे टाकून सुमारे साडेचार किलो बनावट सोने जप्त केले होते. त्यांचाही या जमीन हडप प्रकरणाशी संबंध आहे का याचीही चौकशी केली जात आहे. जमीन हडपप्रकरणी राज्यात खळबळ माजल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग कायद्याखाली याप्रकरणातील संशयिताची माहिती पोलिसांकडून गोळा करून चौकशी सुरू केली होती. त्या माहितीच्या आधारे आता ही कारवाई गेल्या काही महिन्यांपासून एका मागोमाग सुरू केली आहे. ही छापेमारी अधूनमधून सुरूच राहणार आहे. ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर या छाप्यासंदर्भातची संपूर्ण माहिती दिली जाईल, अशी माहिती ईडीच्या सूत्राने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT