पोहताना कॅन सुटून 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू  Pudhari File Fhoto
गोवा

Goa Dudhsagar River Drowning | तीन भावांसह चौघांचा बुडून मृत्यू

Goa Dudhsagar River Drowning | दूधसागर नदीत दुर्घटना : एक बचावला; परिसरात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

धारबांदोडा/दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

कुळे येथील मेटावाडा परिसरात दूधसागर नदीत शनिवारी, दि. १३ जून सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. सुदैवाने एका युवकाचा जीव वाचला असून, त्याने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात शोककळा पसरली आहे.

रामण्णा परशू मदार (वय १९), लक्ष्मण परशू मदार (१९) व हिरण्णा परशू मदार (२०) अशी तीन सख्ख्या भाांची नावे असून, रामण्णा व लक्ष्मण हे जुळे भाऊ होते. ते मूळ बागलकोट कर्नाटक येथील असून, नवेवाडा-वास्को येथे वास्तव्याला होते. चौथा मृत विजय साजीली (वय २१) हा झुआरीनगर येथील रहिवासी होता.

बचावलेला राहुल हरिजन याने घटनेचा थरारक तपशील दिला. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ७वाजता वास्को येथून रेल्वेने पाच युवक कुळे येथे अंघोळीसाठी आले होते. तेथून लिफ्ट घेऊन मेटावाडा पुलाजवळ उतरून ते नदीकाठी गेले. नदी पात्राची पाहणी करताना राहुल हरिजन याने पाणी खोल असल्याने येथे अंघोळ करू नये, असा इशारा दिला होता.

सुरुवातीला सर्वजण माघारी फिरले. मात्र, त्यानंतर पुन्हा अंघोळ करण्याचा हट्ट धरण्यात आला. सुरुवातीला पाणी कमी असल्याने ते पुढे गेले. मात्र, नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही गटांगळ्या खाऊ लागले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही बुडाले. ही घटना सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

राहुल हरिजन याने त्यांना वाचवण्यासाठी लाकडाची काठी फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यानंतर त्याने धावत जाऊन पुलाजवळून एका दुचाकीस्वाराची मदत घेत कुळे पोलिस स्थानक गाठले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही मृतदेह बाहेर काढले. उपनिरीक्षक राहुल नाईक यांनी पंचनामा केला असून, निरीक्षक सगुण कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हिरण्णा परशुराम मदार हा वास्को येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याचे जुळे भाऊ रामण्णा व लक्ष्मण हे मुरगाव बोगदा आयटीआय येथे डिझेल मेकॅनिकचे शिक्षण घेत होते. विजय साजीली हा सांकवाळ झुआरीनगर येथील एमईएस महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत होता. त्यांच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.

घरी आले ते केवळ मृतदेह...

सोमवारपासून आमचे कॉलेज सुरू होणार आहे, त्यामुळे आम्ही कुळे येथे फिरायला जाणार असून, रात्री ८ पर्यंत घरी येऊ, असे सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते. आईला रात्रीपर्यंत परत येतो, असे सांगून निघालेल्या भावांचे मृतदेहच घरी आले. त्यांचे मृतदेह आणल्यानंतर कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT