विठ्ठल गावडे पारवाडकर
पणजी ः 2020 च्या जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये डिचोली तालुक्यातील कारापूर सर्वण, मये चोडण व पाळी या तीन मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, तर लाटंबार्से मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वी हे अपक्ष जि.पं. सदस्य प्रदीप रेवडकर हे भाजपात दाखल झालेले आहेत. त्यामुळे डिचोली तालुक्यातील सर्व चारही जि.पं. पंचायत मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे.
लाटंबार्सेतून अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये समर्थक राहिलेले प्रदीप रेवडकर हे विजयी झाले, तर करापूर सर्वणमधून भाजपचे महेश सावंत, मये चोडणमधून भाजपचे शंकर चोडणकर आणि पाळीमधून भाजपचे गोपाळ सुर्लकर हे निवडून आले होते. 2025 मध्ये लाटंबार्से व सर्वण कारापूर हे दोन जि.पं. मतदारसंघ पुन्हा एकदा खुले राहिलेला असून पाळी मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव झालेला आहे तर मये चोडण महिलांसाठी राखीव झालेला आहे. त्यामुळे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष राहिलेले मये-चोडणचे जि. पं. सदस्य शंकर चोडणकर यांची संधी हुकली आहे. तसेच पाळीचे गोपाळ सुर्लकर यांचीही संधी हुकली आहे.
मुळगावचे माजी सरपंच राहिलेले रेवडकर यांनी 2020 च्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना 5862 मते मिळाली. या मतदारसंघातून भाजपच्या श्रृती घाटवळ यांना 3751 मते तर काँग्रेसचे गोविंद मांद्रेकर यंना 1032 मते प्राप्त झाली. यावेळी हा मतदारसंघ खुला झाला आहे. कारापूर सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपचे नेते महेश सावंत हे 4,497 मते मते घेऊन विजयी ठरले. मगो पक्षाचे योगेश पेडणेकर यांना 3,541 मते मिळाली. येथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता. येथे अपक्ष उमेदवार अजय नाईक यांना1,015 न दुसर्या अपक्ष मेघना येंडे यांना 440 मते मिळाली. यावेळी हा मतदारसंघ खुला झाला आहे. त्यामुळे महेश सावंत यांना पुन्हा संधी मिळू शकते.
मये चोडण जि. पं. मतदारंसघात 2020 मध्ये मयेचे विद्यमान आमदार प्रेमेंद्र शेट यांनी अपक्ष निवडणुक लढवली मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर जिंकले. या मतदारसंघांत 7 उमेदवार रिंगणात होते. त्यातून भाजपचे शंकर चोडणकर हे 3, 397 मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या खालोखाल अपक्ष उमेदवार राजेश कळंगुटकर यांना 2,383 मते मिळाली. कळंगुटकर यांच्या पत्नी राधीका कळंगुटकर या यावेळी येथे गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर लढणार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे दीपकुमार मापारी यांना 313 मते, मगोचे नारायण तारी यांना 239 मते, अपक्ष उमेदवार कृष्णा मयेकर यांना 550 मते, अपक्ष उमेदवार प्रेमेद्र शेट यांना 2,271 मते, काँग्रेसचे प्रसाद चोडणकर यांना 1053 मते मिळाली. यावेळी हा मतदारसंघ महिला राखीव झाला आहे.
लाटंबार्सेचे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवडकर हे लाटंबार्सेतून निवडणूक लढवणार नाहीत. त्याचे कारण म्हणजे प्रदीप रेवडकर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर आमदार डॉ. शेट्ये यांचा सूचनेनुसार ते भाजपात दाखल झाले. डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हे आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढवणार आहेत, त्यामुळे प्रदीप रेवडकर यांना मागे ठेवून मूळ भाजपच्या एखाद्या नेत्याला संधी देण्याची डॉ. शेट्ये यांची योजना आहे. त्यामध्ये तुळशीदास गावकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते.