पणजी : पुढारी वृत्तसेवा
मान्सूनचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असला तरी यंदा राज्यात झालेला पाऊस राष्ट्रीय सरासरीपेक्षा सुमारे १० टक्क्यांनी कमी नोंदला आहे. परिणामी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नसून, पाणीपातळी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.
पाणीसाठ्याची स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. काणकोणमधील चापोली धरण सध्या सुमारे ७५ टक्के भरले आहे. तिळारी धरण नुकतेच ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सामान्यतः ऑगस्टपर्यंत तिळारी धरण या पातळीपर्यंत पोहोचते आणि अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी दरवाजे उघडले जातात.
मात्र, यंदा अद्याप धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत. साळावली धरण गत महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. अंजुणे धरण ९७ टक्के भरले असले तरी त्याचे दरवाजेही अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. पंचवाडी धरणाची पाणीपातळी या आठवड्यात ९९ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर आमठाणे धरण ९६ टक्के भरले आहे.